हिंदू-मुस्लीम ऐक्याचं अनोखं प्रतीक ठरलेल्या गणेशोत्सवाची नुकतीच सांगता झाली असून लाडक्या बाप्पाला त्याच्या सर्वधर्मीय भक्तांनी मनोभावे निरोप दिला. मात्र, एकीकडे देशात हिंदू-मुस्लीम ऐक्याची अशी असंख्य उदाहरणं असताना त्याचवेळी दुसरीकडे या ऐक्याला गालबोट लावणाऱ्या काही घटनाही समोर येताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये घडलेला असाच एक प्रकार आता समोर आला असून त्यासंदर्भात पोलीस सविस्तर तपास करत आहेत. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. एका दिव्यांग मुस्लीम व्यक्तीला फक्त मंदिरात प्रसाद खाल्ला म्हणून जमावानं मारहाण केल्यायचा हा प्रकार मंगळवारी घडला आहे. मारहाणीनंतर उपचारांदरम्यान या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या सुंदर नगरी भागातली ही घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला आहे. मोहम्मद इसरार असं या व्यक्तीचं नाव असून मंगळवारी संध्याकाळी ते त्यांच्या घराच्या बाहेर जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांचे वजील अब्दुल वाजिद यांनी त्यांची विचारपूस केली असता घडला प्रकार त्यांनी सांगितला. अब्दुल वाजिद यांनी यासंदर्भात पोलिस तक्रार केली असून त्यात ही सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
प्रसाद चोरल्याचा जमावाचा आरोप
मोहम्मद इसरार यांनी एका मंदिरात प्रसाद खाल्ल्यामुळे त्यांना जमावाने मारहाण केल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. इसरार यांना जमावाने एका खांबाला बांधून लाठ्याकाठ्यांनी त्यांना मारहाण केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. इसरार यांनी प्रसाद घेतला नसून चोरल्याचा आरोप करत जमावाने त्यांना मारहाण केल्याचं इसरार यांनी सांगितल्याचं वडील अब्दुल वाजिद यांचं म्हणणं आहे.
अनेकजण ताब्यात, CCTV ची तपासणी
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून घटनास्थळावरच्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पीडित व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी होती अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळेच जमावाने मारहाण करताना जाब विचारल्यावर मोहम्मद इसरार यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देता आली नाहीत.