अदनान मन्सूरी. १८ वर्षीय तरूण. गेल्या पाच महिन्यांपासून तुरूंगात होता. आता न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला आहे. ज्या आरोपांसाठी त्याला तुरूंगात पाठवण्यात आलं होतं, त्यातील तक्रारदार आणि प्रत्यक्षदर्शीनं साक्ष बदलली आहे. पोलिसांच्या दबावामुळे सही केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनं न्यायालयात केला. पण, अटक आणि जामीनमध्ये पाच महिन्यांचा कालावधी गेला.

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये १७ जुलै २०२३ रोजी महाकालची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर अदनान मन्सूरी आणि दोन मुलांनी इमारतीवरून थुंकल्याचा आरोप करत सावन लोट याने तक्रार दाखल होती.

याप्रकरणी मन्सूरी आणि दोघांविरोधात कलम २९५-अ, १५३-अ आणि अन्य तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मन्सूरीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर, दोन अल्पवयीन तरूणांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं.

या घटनेच्या दोन दिवसानंतर १९ जुलै २०२३ ला मन्सूरीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला होता. घराचे काही भाग बेकायदेशीर असल्याचं सांगून बुलडोझर चालवण्यात आलेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी ( १५ जानेवारी ) अदनान मन्सूरीच्या जामीन अर्जावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी तक्रारदाराने मिरवणुकीत कुणालाही थुंकताना पाहिलं नाही. पोलिसांच्या दबावाखाली सही केल्याचा दावा केला. यानंतर न्यायालयाने अदनान मन्सूरीला ७५ हजार रूपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.