I Love Mohammad Controversy UP: मालमत्तेच्या वादातून मुस्लिम शेजाऱ्यांना खोट्या प्रकरणामध्ये गुंतवण्यासाठी चार मंदिरांच्या भिंतींवर “आय लव्ह मोहम्मद” लिहिल्याबद्दल उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये चार जणांना अटक करण्यात आली आहे.

अलीगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीरज जादोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांची नावे जिशांत कुमार, आकाश कुमार, दिलीप कुमार आणि अभिषेक सारस्वत अशी आहेत. या प्रकरणातील पाचव्या आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव राहुल आहे, तो सध्या फरार आहे. हे सर्वजण ३० ते ३५ वयोगटातील आहेत.

पोलिसांनी सांगितले की, २५ ऑक्टोबर रोजी चार मंदिरांच्या भिंतींवर “आय लव्ह मोहम्मद” लिहिलेले आढळले. यानंतर एका उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्याने मुस्लिम व्यक्तींवर आरोप करत तक्रार दाखल केली होती.

“तक्रारीनंतर पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी भिंतींवर लिहिलेल्या घोषणा पुसल्या आणि तेथे उपस्थित असलेल्या जमावाला शांत केले. त्यानंतर मौलवी मुस्तकीम, गुल मोहम्मद, सुलेमान, सोनू, अल्लाबक्ष, हसन, हमीद आणि युसूफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता”, असे पोलीस अधिकारी नीरज जादोन म्हणाले.

‘त्या’ गोष्टीमुळे खरे आरोपी जाळ्यात

दरम्यान, पोलिसांना या घोषणा चुकीच्या पद्धतीने लिहिल्याचा संशय आला. सर्व घोषणा एकाच पद्धतीने लिहिल्या गेल्या होत्या. सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या निदर्शनांदरम्यान बॅनरवर “आय लव्ह मोहम्मद” ज्या पद्धतीने लिहिले होते, त्याप्रमाणे मंदिरांच्या भिंतीवर लिहिलेल्या घोषणा जुळत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे खरे गुन्हेगार शोधून काढले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली.

पोलीस अधिकारी नीरज जादोन म्हणाले की, “पोलिसांना असे आढळून आले की या आरोपींचा काही मुस्लिमांशी वैयक्तिक वाद होता. त्यामुळे त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे.”

काय आहे ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद?

हा वाद ४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रावतपूर परिसरातील बारावफात (ईद-ए-मिलाद-उन-नबी) मिरवणुकीदरम्यान सुरू झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर काही लोकांनी “I Love Mohammad” असा बॅनर लावल्याचा आरोप आहे. या कृतीला हिंदू संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्या मते हा एक नवा पायंडा आहे आणि यामागे जाणूनबुजून भावना भडकावण्याचा प्रयत्न आहे.