scorecardresearch

भाजपाला मत दिलं म्हणून मुस्लीम महिलेला घरातून हाकललं; तीन तलाकचीही दिली धमकी, उत्तर प्रदेशातला धक्कादायक प्रकार

पती तस्लीम अन्सारी यांच्यासोबत आपण प्रेमविवाह केला होता. मात्र ही घटना घडली तेव्हा तस्लीम यांनीही आपली बाजू घेतली नसल्याचं उझ्मा यांनी सांगितलं.

भाजपाला मत दिलं म्हणून मुस्लीम महिलेला घरातून हाकललं; तीन तलाकचीही दिली धमकी, उत्तर प्रदेशातला धक्कादायक प्रकार

उत्तर प्रदेशात एक अशी घटना घडली आहे, जिच्याबद्दल वाचून तुम्हालाही दुःख होईल. उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम महिलेला घरातून हाकललं आहे. आणि कारण काय? तर भाजपाला मत दिलं म्हणून! बरेलीतील उझ्मा अन्सारी यांना घरातून हाकलण्यात तर आलंच पण तीन तलाक देण्याची धमकीही देण्यात आली.


एबीपी न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. उझ्मा माध्यमांशी बोलताना सांगत आहेत की, त्यांना घरातून हाकलण्यात आलं आहे. तसंच त्यांना तीन तलाकची धमकीही देण्यात आली आहे. उझ्मा या गौंतिया इजाजनगर इथल्या रहिवासी आहेत. त्यांना त्यांच्या पतीचे मामा तयब यांनी समाजवादी पक्षाला मत देण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी भाजपाला मत दिल्याने आता त्यांना तीन तलाकच्या धमक्या देण्यात येत आहेत.


उझ्मा यांना ११ मार्च रोजी घरातून हकलण्यात आलं. बरादरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि चौकशीही सुरू झाली आहे. आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहणाऱ्या उझ्मा यांनी भाजपाला मत दिलं होतं कारण नरेंद्र मोदींच्या सरकारने तीन तलाकवर कायदेशीर बंदी घातली होती. उझ्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही, त्यांना चार बहिणी आहेत आणि त्यांचे वडील मजूर आहेत. महिन्यातून दोन वेळा भाजपा सरकारकडून मोफत किराणा आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचं वाटप केलं जातं हे त्यांना आवडलं.


उझ्मा पुढे म्हणाल्या की, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात तयब (उझ्मा यांच्या पतीचे मामा ) उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार येणार अशी चर्चा करत होता. त्यावेळी बोलताना उझ्मा यांनी सांगितलं की मीही योगींच्या बाजूने मत दिलं आहे. त्यानंतर संतापलेल्या तयब यांनी उझ्मा यांना तीन तलाकची धमकी दिली आणि सरकारलाच आता घटस्फोटापासून तुला वाचवायला सांग अशी धमकी दिली.


पती तस्लीम अन्सारी यांच्यासोबत आपण प्रेमविवाह केला होता. मात्र ही घटना घडली तेव्हा तस्लीम यांनीही आपली बाजू घेतली नसल्याचं उझ्मा यांनी सांगितलं. तस्लीम यांनी आपल्या मामाचीच बाजू घेतली आणि मला घरातून बाहेर काढलं, तीन तलाकची धमकीसुद्धा दिली. पण मी याला विरोध कऱण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, असंही उझ्मा यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2022 at 10:26 IST

संबंधित बातम्या