बिहारमधील मुस्लिम समाजाने आजपर्यंत सर्व राजकीय पक्षांचे पर्याय आजमावून पाहिले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी भाजपबरोबर यावे, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. बिहारमधील २४ मतदारसंघात ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने उभ्या केलेल्या आव्हानाबद्दल प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ओवेसींनी बिहारमध्ये निवडणूक लढवल्याने भाजपला फायदा होईल, अशी चर्चा आहे. मात्र, ओवेंसींपेक्षा लालू-नितीश आणि काँग्रेस यांच्या भ्रष्ट युतीने निवडणूक लढवणे, हे आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल असे नक्वी यांनी सांगितले. बिहारमधील मुस्लिम समाज यावेळी भाजपला साथ देईल, असा विश्वास आम्हाला आहे. कारण, त्यांनी आत्तापर्यंत सर्व पर्याय आजमावून पाहिले आहेत. जर मुस्लिमांना ओवेसी किंवा लालूप्रसाद यांनाच साथ द्यायची असेल तर आमचे सांगणे एवढेच आहे की, सध्या राज्यात भाजपला मतदान करण्याची मानसिकता आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी बिहारमधील मुस्लिम समाजाने भाजपला मोठ्याप्रमाणावर मतदान केले होते. त्यामुळे भाजपच्या यशात त्यांचे मोठे योगदान असल्याचेही नक्वी यांनी सांगितले. हीच गोष्ट ध्यानात ठेवून भाजपने आत्ताच्या निवडणुकीत प्रत्येक समाजातील उमेदवार उभे केले आहेत. राजकीय सत्तेत समाजातील सर्व घटकांना सहभाग मिळावा, हीच भावना त्यामागे आहे. सध्या आपण सुशासनासाठी कटिबद्ध असलेल्या काळात आहोत आणि या व्यवस्थेवर समाजातील प्रत्येकाचा तितकाच अधिकार असल्याचे नक्वी यांनी म्हटले.