उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ५ ऑगस्ट रोजी मोठी ढगफुटी झाली. यामुळे धराली गावातील मुख्य बाजारपेठ चिखलाखाली गाडली गेली. या दुर्घटनेत हॉटेल व्यावसायिक जय भगवान थोडक्यात बचावले. ढगफुटी होण्याआधी ते जवळच असलेल्या एका मंदिरात गेल्यामुळे वाचले. या घटनेबद्दल त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना ढगफुटीचा थरार कथन केला.

ते म्हणाले, मंगळवारी पहाटे मी गावातील नाग देवतेच्या उत्सवासाठी जवळच असलेल्या मंदिरात गेलो. मात्र सकाळी आम्हाला मुख्य बाजारपेठेतून किंकाळ्या ऐकू आल्या. काही जण शिट्याही वाजवत असल्याचे जाणवले. पण आम्हाला तेव्हा काही कळू शकले नाही. थोड्या वेळाने मंदिरापर्यंत चिखल, पाणी आणि दगडगोट्यांचा राडारोडा येऊन पोहोचला तेव्हा आम्हाला ढगफुटीबद्दल कळले.

धराली गावात सध्या सगळीकडे चिखलाचे आणि दगडमातीचे ढिगारे साचले आहेत. चिखलाखाली इमारती, घरे दबले गेले आहेत. चार दिवस उलटूनही अजूनही बचाव कार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप ६० लोक बेपत्ता आहेत, तर दोन मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले गेले.

चार मजल्यांचे हॉटेल जमीनदोस्त

या ढगफुटीमुळे जय भगवान यांचे चार मजली इमारत असलेले हॉटेल कोसळले आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. “सुरुवातीला काय झाले, याची मला बिलकुल कल्पना नव्हती. मी मंदिरातून धावत माझ्या घरी गेलो. तिथून काही अंतरावर माझे घर होते. तिथे गेल्यावर कळले की, माझ्या घरापर्यंतही पूराचे पाणी आले आहे.

झाडाच्या पानाप्रमाणे हॉटेल वाहून गेले

या ढगफुटीचा एक व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला होता. सदर व्हिडीओ भगवान यांनी पाहिल्यावर ते म्हणाले, त्या व्हिडीओमध्ये माझे हॉटेल झाडाच्या पानाप्रमाणे वाहून जाताना दिसत आहे. चार मजल्यांच्या माझ्या हॉटेलमध्ये ४० खोल्या होत्या. पण आता काहीच उरले नाही.

सुदैवाने हॉटेल रिकामी होते

भगवान पुढे म्हणाले की, ज्यादिवशी ढगफुटीची घटना घडली, त्यादिवशी धराली गावातील बाजारपेठ रिकामी होती. पावसाळ्यात येथे पर्यटक कमी येतात, त्यामुळे बहुतेक हॉटेल बंद असतात. माझ्या हॉटेलमध्येही बुकिंग नव्हती. जेव्हा चार धाम यात्रा असते, तेव्हा माझ्या हॉटेलमध्ये बुकिंग मिळत नाही. सुदैवाने त्यादिवशी हॉटेलचे कर्मचारी आणि माझा भाचाही हॉटेलमध्ये नव्हते.