PM Narendra Modi on Vote Adhikar Yatra Bihar: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये काढलेल्या वोट अधिकार यात्रेत शेवटच्या वाद निर्माण झाला. एका व्यक्तीने यात्रेच्या मंचावर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द काढले होते. या व्यक्तीला लगेचच अटकही करण्यात आली. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगावर भाष्य केले असून आपल्या आईबद्दल अपशब्द काढल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
बिहारमधील एका जाहीर कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आई आपले जग आहे. आई आपला स्वाभिमान आहे. आईचा स्वाभिमान आणि अस्मिता बाळगण्याची बिहारची संस्कृती आहे. पण या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी काय घडले. आरजेडी-काँग्रेसच्या व्यासपीठावरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ही शिवीगाळ फक्त माझ्या आईचा अपमान करणारी नाही. तर देशातील माता, भगिनी आणि सर्वच महिलांचा अपमान करणारी आहे. मला माहिती आहे. या प्रसंगाबद्दल ऐकून बिहारच्या प्रत्येक आईला वाईट वाटले असेल. माझ्या हृदयात जितके दुःख आहे, तितकेच बिहारच्या लोकांनाही दुःख झाले आहे, याचीही मला कल्पना आहे.”
राजकारणाशी संबंध नसलेल्या माझ्या आईला राजकारणात का ओढले जात आहे? असाही प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. आरजेडी आणि काँग्रेसने माझ्या आईचा राजकारणासाठी गैरवापर का केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला उद्योजकता आणि स्वावलंबन यावर बिहारमध्ये एका नवीन सहकारी उपक्रमाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी हे भावना व्यक्त केली.
दरम्यान काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेले अवमानकारक विधान भाजपाच्या एजंटनी केलेले आहे. जे दरभंगाच्या रॅलीत घुसले होते. “अवमानकारक विधान भाजपाच्याच लोकांनी आमच्या रॅलीत घुसखोरी करून केले होते. आमच्या यात्रेच्या मुद्द्यावरून लक्ष दूर करण्यासाठीच या विषयाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यांच्या घुसखोरांना आम्ही पकडले असून यातून त्यांची अगतिकता लक्षात येते”, असेही खेरा म्हणाले.