इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमेत घुसून दीड हजाराहून अधिक इस्रायली नागरिकांचा बळी घेतला होता. त्याच्या उत्तरादाखल इस्रायलकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तेव्हापासून इस्रायल पॅलेस्टाईनवर सतत हल्ले करत आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील काही भीषण घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. इस्रायलने हमासच्या काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. यापैकी जमाल हुसैन अहमह रादी (वय ४७) आणि त्याचा मुलगा अब्दल्ला (वय १८) यांनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादयाक खुलासे केले. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी केल्यानंतर हमासने महिलांना कसे लक्ष्य केले, याचे धक्कादायक वर्णन या बापलेकांनी केले.

इस्रायल डिफेन्स फोर्सने पॅलेस्टाइनमधून हमासच्या हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. डेली मेल या वृत्त संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे.

कोणत्या देशांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना घोषित केले? भारताने अद्याप घोषणा का नाही केली?

चौकशीदरम्यान जमालने सांगितले की, इस्रायल-गाझा सीमेवर असलेल्या किबुत्झ नीर या परिसरातील एका घरातून इस्रायली महिलेचा किंचाळण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. आम्ही त्या घरात शिरलो आणि त्या महिलेवर बलात्कार केला. मी त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, बंदूक दाखवून तिच्यावर बलात्कार केला, असे जमालने सांगितले.

जमालनंतर त्याचा १८ वर्षांचा मुलगा अब्दल्ला याचीही चौकशी झाली. अब्दल्ला म्हणाला की, माझ्या वडिलांनी त्या महिलेवर बलात्कार केल्यानंतर मीही बलात्कार केला. त्यानंतर माझ्या चुलत भावांनीही असेच केले. त्यानंतर आम्ही महिलेला सोडून निघू लागलो. पण माझ्या वडिलांनी तिला मारून टाकले.

या व्हिडीओमध्ये जमाल आणि अब्दल्ला राखाडी रंगाच्या ट्रॅकसुटमध्ये बसलेले दिसत असून त्यांच्या हातात बेड्या घातलेल्या आहेत. व्हिडीओमध्ये दोघांच्या मागे इस्रायलचा झेंडा दिसत आहे. जमालने सांगितले की, इस्रायलमध्ये घुसल्यानंतर त्यांनी प्रत्येक घराची तपासणी केली. तिथे जे जे कुणी सापडले त्यांना एकतर मारून टाकले गेले किंवा त्यांचे अपहरण करण्यात आले.

‘हमास जे करतं तेच पश्चिम बंगालमध्ये होत आहे’, संदेशखली प्रकरणावरून भाजपा नेत्याची टीका

सध्या सोशल मीडियावर या बाप-लेकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या दोघांनी स्वतःच्याच पापाचा पाढा वाचला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावर त्याबद्दल कोणताही पश्चाताप दिसत नाही. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्यानंतर ते शांतपणे त्याचे वर्णन करत आहेत.

पाच महिलांना डांबून ठेवलं

काही दिवसांपूर्वी हमासकडून इस्रायलच्या पाच महिलांचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला होता. ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात या महिलांचे अपहरण करण्यात आले होते. आजही या महिला हमासच्या ताब्यात असल्याचा दावा इस्रायली सरकारने केला आहे. “हा व्हिडीओ पाहा आणि आमच्या लोकांना पुन्हा घरी आणण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या”, असे आवाहन सरकारने केले आहे. या पाच महिलांना कशाप्रकारे वागणूक दिली जात आहे, याचाही व्हिडीओ नुकताच समोर आला होता. त्यावरून इस्रायली सरकारने आवाहन केले.