Nagaland Killings: अमित शाह यांचा दावा पीडित व्यक्तीने फेटाळला, म्हणाला “आम्ही पळत नव्हतो, इशारा न देताच सर्व बाजूंनी गोळीबार…”

“कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घऱी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. बॉम्बस्फोट झाल्यासारखे आवाज होत होते”

Nagaland killings, Nagaland Firing, Amit Shah, अमित शाह
"कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घऱी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. बॉम्बस्फोट झाल्यासारखे आवाज होत होते"

नागालँडमधील मोन जिल्ह्यात अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या २१ पॅरा कमांडो गटातील जवानांनी तिरू गावाभोवती गराडा घातला होता. संशयित अतिरेकी समजून वाहनाला थांबवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, या आदेशानंतरही वाहन न थांबता भरधाव गेल्याने जवानांनी वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारात वाहनातील ८ जणांपैकी ६ ठार झाले. वाहनामध्ये अतिरेकी नव्हे, तर खाण कामगार असल्याचे जवानांच्या लक्षात येताच त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सदनांत सोमवारी निवेदनाद्वारे दिली.

नागालँडमधील गोळीबार गैरसमजातून

मात्र आता हल्ल्यातून बचावलेल्या एका पीडित व्यक्तीने अमित शाह यांनी दिलेल्या माहितीच्या अगदी उलट सांगितलं आहे. आपण पळत नव्हतो असं त्याने सांगितलं असून कोणताही इशारा न देता जवानांनी गोळीबार केल्याचं त्याने म्हटलं आहे. अमित शाह यांनी निवेदन देताना जवानांनी लोकांना थांबण्याचा इशारा दिला होता, मात्र ते धावत असल्याने गोळीबार केला असा दावा केला होता.

या गोळीबारातून दोन लोक वाचले असून त्यातील २३ वर्षीय शिवांगने ही माहिती दिली आहे. शिवांगच्या खांदा आणि छातीवर गोळी लागली आहे. त्याच्यावर आसाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जवानांच्या गोळीबारात सहा मजुरांसह १४ ठार ; नागालॅण्डमधील घटनांमध्ये एका जवानाचाही मृत्यू

द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शिवांगने अमित शाह यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती फेटाळून लावली आहे. संपूर्ण घटनाक्रम पुन्हा आठवताना त्याने सांगितलं की, “कोळसा खाणीत काम संपवल्यानंतर आम्ही पिक-अप ट्रकमधून घऱी परतत होतो. त्याचवेळी अचानक आमच्यावर गोळीबार सुरु झाला. किती वेळ हा गोळीबार सुरु होता हे आठवत नाही, पण बराच वेळ हे सुरु होतं. बॉम्बस्फोट झाल्यासारखे आवाज होत होते. अंधारही झालेला नव्हता, तरीही ते गोळीबार करत होते”.

“आम्हाला थांबण्याचा इशारा मिळाला नव्हता”

गोळीबार सुरु होताच आम्ही गाडीत खाली झोपलो असल्याचं त्याने सांगितलं. “आम्हाला थांबण्याचा इशारा देण्यात आला नव्हता. आमच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. आम्ही पळण्याचा प्रयत्न करत नव्हतो,” असं त्याने सांगितलं आहे.

“यानंतर मला एका दुसऱ्या वाहनातून नेण्यात आलं. माझ्या भावासह अनेकांचा मृत्यू झाल्याची मला तेव्हा कल्पना होती,” असं शिवांगने म्हटलं आहे. दरम्यान जवानांनी केलेल्या गोळीबारात स्थानिकांचा मृत्यू झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

नेमकं काय झालं –

नागालँडमधील मोन जिल्ह्यात रविवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये सहा खाण कामगारांसह १४ नागरिकांचा मृत्यू झाला व ११ जण जबर जखमी झाले. मजुरांवर झालेल्या गोळीबारानंतर उसळलेल्या हिंसाचारात एका जवानाचाही मृत्यू झाला. ‘नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड’ (एनएससीएन-के) संघटनेच्या गटाचे बंडखोर सदस्य समजून सुरक्षारक्षकांनी खाण कामगारांवर गोळीबार केला. गैरसमजातून झालेल्या या गोळीबारात सहा खाणमजूर ठार झाले. हा प्रकार समजल्यानंतर कामगारांचा शोध घेणाऱ्या ग्रामस्थांनी लष्करी वाहनांना घेराव घातला. त्यानंतर ग्रामस्थ आणि सुरक्षा जवान यांच्यात झालेल्या संघर्षामध्ये जवानाचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी जवानांनी ग्रामस्थांवर पुन्हा गोळीबार केला, त्यात सात नागरिक ठार झाले.

अमित शाह काय म्हणाले –

जवानांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला. गैरसमजातून निष्पाप नागरिक ठार झाले असून लष्कराकडून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. लष्कराने निवेदन प्रसिद्ध करून खेद व्यक्त केला आहे. मोनमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. या घटनेबद्दल केंद्र सरकार खेद व्यक्त करत आहे, असे शहा म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagaland killings they shot right at us no signal to stop says ambush survivor sgy

ताज्या बातम्या