AIMIM MP Asaduddin Owaisi on Pakistan : भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून ऑपरेशन बुनयान-उन-मारसूसची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यावरून एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानी नेत्यांची अक्कलच काढली आहे. नालायकांना अक्कलही नाही असं म्हणत त्यांना मूर्ख म्हटलं आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्या आणि ऑपरेशन सिंदूरवरील भारताच्या राजनैतिक संपर्काचा भाग म्हणून कुवेतमध्ये असलेले ओवेसी म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधान आणि त्यांच्या लष्करप्रमुखांना नक्कल करण्यासाठी मेंदूची आवश्यकता आहे.
नक्कल करायला या नालायकांकडे अक्कलही नाहीय
असदुद्दीन ओवैसी कुवेतमध्ये भारतीयांशी बोलताना म्हणाले, या मूर्ख लोकांना भारताविरोधात सामना करायचा आहे. २०१९ मध्ये चीनच्या लष्करी ड्रिलचे फोटो यांनी भारताविरोधात विजय मिळवल्याचा दावा करत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना दाखवले. नक्कल करायला अक्कल लागते. या नालायकांकडे अक्कलही नाहीय.”
भारतावर लष्करी कारवाईत विजय मिळवल्याचा दावा करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच पंतप्रधान शरीफ यांना एक फोटो दाखवला. पण हा फोटो चिनी लष्करातील ड्रिलचा होता. या कार्यक्रमाला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यासह उच्च राजकीय आणि लष्करी नेतृत्व उपस्थित होते.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नेत्यांच्या भूमिकेबद्दल टीका केली आहे.