Cheating case in Bihar Nalanda District: बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. एका औषधांच्या दुकानात कामाला असणाऱ्या व्यक्तीने फक्त दोन अक्षरं बदलून मालकाला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याची बाब पोलिसांच्या समोर आली आहे. गंडा घालण्यासाठी या व्यक्तीने वापरलेली शक्कल पाहून पोलीसदेखील हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे ही लूट चालू असताना खुद्द दुकान मालकाला कोणताही सुगावा लागला नाही. शेवटी दुकान मालकाने उधारीसाठी इतरांना फोन केले, तेव्हा सगळा प्रकार समोर आला.
नेमकं घडलं काय?
नालंदा जिल्ह्यातील लहेरी भागातला हा प्रकार असून एकूण ४० लाखांचा गैरव्यवहार झाल्याची बाब निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नुकतीच आरोपी रवी शंकर कुमार व त्याची पत्नी जुली कुमारी उर्फ जुही कुमारी हिला अटक केली आहे. या प्रकरणी दुकानमालक रुपेश कुमार सिंह यानं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा पती-पत्नीला बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीतून सगळा प्रकार पोलिसांना समजला.
आरोपींची मोडस ऑपरेंडी…
रुपेश कुमार सिंह यांच्या मालकीचं होलसेल औषधांचं दुकान आहे. त्यांच्या दुकानाचं नाव आहे श्री साई फार्मा. रवी शंकर कुमार हा त्यांच्याकडे दुकानात कामाला होता. रोजच्या व्यवहारांमधून रवी कुमारला आपण मोठा आर्थिक फायदा मिळवू शकतो, अशी कुणकुण लागली. त्याने यासाठी एक युक्ती शोधून काढली. रुपेश सिंह यांच्या दुकानाच्या नावाचं इंग्रजीतलं स्पेलिंग होतं Shri Sai Pharma. रवीनं Shri मधला i बदलून त्या जागी ee समाविष्ट केला.
Shree Sai Pharma या नावाने रवीने नवीन बँक खातं उघडलं. रुपेश कुमार सिंह यांच्या दुकानाच्या नावाने जे काही चेक मिळायचे, ते सगळे रवी सिंह या बदललेल्या नावाने उघडलेल्या नव्या बँक खात्यात जमा करायचा. एकदा का खात्यात रक्कम जमा झाली, की तिथून ती रवी सिंहची पत्नी जुली हिच्या खात्यात जमा व्हायची.
कसा उघड झाला प्रकार?
रवी कुमार सिंहचा हा कारनामा बराच काळ चालू होता. रुपेश कुमार सिंह यांना या प्रकाराचा कोणताही संशय आला नाही. पण जेव्हा त्यांनी उधारी चुकती करण्यासाठी संबंधितांना फोन करण्यास सुरुवात केली, तेव्हा आपण उधारी आधीच चुकती केल्याची बाब त्यांनी रुपेश सिंह यांना सांगितली. हे ऐकून रुपेश सिंहदेखील चक्रावून गेले. त्यांनी अधिक चौकशी केली असता संबंधित व्यक्तींनी उधारी चुकती करण्यासाठीचे चेक रवी सिंह याच्याकडे सोपवल्याचं सांगितलं.
रुपेश कुमार यानं रवी सिंहला विचारणा केली असता त्यावर रवी टाळाटाळ करू लागला. रुपेश कुमार यांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आपला भांडाफोड होणार असल्याचं लक्षात येताच रवी सिंहनं पत्नी जुलीसोबत पळ काढला. पण शेवटी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत रवीनं आपला गुन्हा कबूल केला. आता दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.