१६ मार्च रोजी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या काही विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. हे सगळेजण नमाज अदा करत होते. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध दर्शवला आणि मारहाण केली. काही स्थानिक विद्यार्थ्यांनीही या सगळ्यांना विरोध दर्शवला. या हाणामारीत काही विद्यार्थी जखमीही झाले. यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रीलंका आणि ताजिकिस्तानचे दोन विद्यार्थी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाला याविषयी निवेदन द्यावं लागलं. या प्रकरणी आता विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. नीरजा गुप्ता यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

काय म्हटलं आहे नीरजा गुप्ता यांनी?

“फक्त नमाज हे हिंसेचं कारण असू शकत नाही. शाकाहारी विद्यार्थ्यांचा विचार करुन विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्तन हे अधिक परिपक्व आणि भान ठेवून केलं पाहिजे. इंडियन एक्स्प्रेसशी चर्चा करताना नीरजा गुप्ता म्हणाल्या की फक्त नमाज अदा करणं हे हिंसाचार आणि हाणामारीचं कारण असू शकत नाही.”

विदेशी विद्यार्थ्यांनी जपून वागलं पाहिजे

त्या पुढे म्हणाल्या, “जे काही घडलं ते एका विशिष्ट धर्माबाबत नाही. गुजरातमध्ये मुख्यतः शाकाहारी लोक राहतात. विद्यापीठातही त्याच विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. फक्त नमाज अदा करण्यावरुन हिंसाचार किंवा हाणामारी झालेली नाही. या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी खाऊन त्याचं खरकटं इकडे तिकडे फेकलं. हा मुद्दाही कारणीभूत असू शकतो. हे सगळे विदेशी विद्यार्थी आहेत त्यामुळे त्यांना झालेली मारहाण ही चटकन समोर येते. मात्र नमाज अदा करणं हे एकमेव कारण असू शकत नाही. विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्तन आणखी जबाबदारीने केलं पाहिजे.”

हे पण वाचा- अन्वयार्थ: परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण, म्हणून?

नमाज अदा करण्याच्या विरोधात आम्ही नाही

आम्ही नमाज अदा करण्याच्या विरोधात जाऊ इतके असंवेदनशील आणि असहिष्णू नाही. मात्र विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचं वर्तन सुधारण्याची गरज आहे. त्यांनी आणखी जबाबदारीने वागलं पाहिजे. काही सर्व्हेंमध्ये आलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये मुख्यत्वे शाकाहारी समाज राहतो. मांस खाणारी लोकसंख्या ही काही भागांमध्ये ४० टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र बहुतांश भागांमध्ये शाकाहारीच लोक राहतात. गुजरात विद्यापीठात अफगाणिस्तान, उजबेकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, सीरिया आणि अफ्रिका या ठिकाणाहून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात.