देशाच्या सत्तेचे सुकाणू आपल्या हाती येण्याचे स्वप्न तिसरी आघाडी कितीही रंगवीत असले तरी ही आघाडी देशाला अधिक मागास करणारीच असल्याने ती देशाची घडीच विस्कटून टाकेल, असा घणाघाती हल्ला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोलकात्यात जाहीर सभेत केला.
डाव्या पक्षांच्या सभांसाठीच एके काळी गजबजणारे परेड मैदान मोदींच्या सभेसाठीच्या तुडुंब गर्दीने फुलून गेले होते. दिल्लीत जमलेल्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी ही गर्दी पाहावी आणि जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे, याची नोंद घ्यावी, असा टोलाही मोदी यांनी हाणला. डावे पक्ष आणि तिसऱ्या आघाडीवर जोरदार हल्ला चढविणारे मोदी यांनी या सभेत ममता बॅनर्जी यांच्यावर फारशी टीका केली नाही.
देशाच्या ईशान्येकडील राज्यांत या तिसऱ्या आघाडीच्या घटक पक्षांची सरकारे आहेत. हाच भाग आर्थिकदृष्टय़ा देशातला सर्वात मागास भाग आहे. आता देशाच्या राजकारणातून या तिसऱ्या आघाडीला कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
सभेत प्रथम ममता बॅनर्जी यांच्याविरोधात टीकेचा सौम्य सूर लावून मोदी यांनी नंतर राज्यात त्यांचेच सरकार राहावे, अशीही सदिच्छा व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांच्या पोरिबोर्तन मोहिमेच्या अनुषंगाने मोदी यांनी लोकांना विचारले की, तुम्हाला परिवर्तन अनुभवायला मिळाले का? अशा परिवर्तनाला केंद्राचीही साथ लागते. तुम्ही आम्हाला केंद्रात सत्ता द्या. आम्ही देशाचा कारभार पाहू, ममतादीदींना राज्याचा कारभार पाहू दे. त्यांना आम्ही पश्चिम बंगालच्या विकासासाठी साथ देऊ असे मोदी यांनी सांगितले.

प्रणबदांवर अन्याय!
प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधानपदापासून गांधी घराण्यानेच दोन वेळा रोखल्याचा आरोपही मोदी यांनी या सभेत केला. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी कोलकात्यात होते. लोकशाहीच्या दृष्टीने विचार करता इंदिराजींच्या मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी अशा प्रणब मुखर्जी यांचीच पंतप्रधानपदी नियुक्ती व्हायला हवी होती. मात्र राजीवजी तातडीने दिल्लीस गेले आणि पंतप्रधान झाले. इतकेच नव्हे तर प्रणबदांबद्दल काँग्रेस श्रेष्ठींमध्ये इतका आकस होता की राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातदेखील त्यांना स्थान मिळाले नाही. २००४ मध्येसुद्धा प्रणबदांना डावलून मनमोहन सिंग यांना मॅडम सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदी बसविले. बंगालच्या जनतेने हा अन्याय विसरू नये, असे आवाहनही मोदी यांनी केले.