PM Narendra Modi Meets Keir Starmer: भारत दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे.
“पंतप्रधान मोदींनी यावर भर दिला की लोकशाहीत कट्टरतावाद आणि दहशतवादाला स्थान नाही आणि त्यांना स्वातंत्र्यांचा गैरवापर करण्याची परवानगी दिली जाऊ नये. दोन्ही बाजूंनी उपलब्ध असलेल्या कायदेशीर चौकटीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे”, असे विक्रम मिस्री यांनी सांगितले.
यावेळी विक्रम मिस्री यांनी, भारत आणि ब्रिटन दोन्ही देशांच्या नागरिकांना फायदा व्हावा यासाठी अनेक आघाड्यांवर एकत्र काम करत असल्यावर प्रकाश टाकला.
दोन्ही देशांमधील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे विकसित भारताच्या दृष्टिकोनाला पाठिंबा मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही मिस्री यांनी नमूद केले.
कीर स्टार्मर यांच्याबरोबर भारत दौऱ्यावर आलेल्या शिष्टमंडळात ब्रिटनमधील १२५ प्रमुख उद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. भारताला भेट देणारे हे ब्रिटनचे आतापर्यंतचे सर्वात मोठे शिष्टमंडळ आहे.
भारत दौऱ्यावर आल्यापासून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतीय उद्योजकांशी संवाद साधला, चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य मिळवण्यासाठी यशराज फिल्म्सला भेट दिली आणि फुटबॉलशी संबंधित कार्यक्रमात भाग घेतला. आपल्या भाषणात स्टार्मर यांनी दोन्ही देशांच्या उद्योगपतींना संधींचा फायदा घेण्यापासून रोखणारे अडथळे दूर करण्यासाठी त्यांचे सरकार काय करू शकते याची रूपरेषा सांगण्याचे आवाहन केले.
मोदी-स्टार्मर भेट
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर स्टार्मर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दरम्यान, मोदी व स्टार्मर यांच्या भेटीनंतर दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. स्टार्मर यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत व ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. दोन्ही देशांमधील भागीदारी ही जागतिक स्थिरता व आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे.”
कोण आहेत कीर स्टार्मर?
२ सप्टेंबर १९६२ रोजी लंडनजवळच्या सरे येथील एका कामगार कुटुंबात कीर स्टार्मर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील टूलमेकर तर आई एका रुग्णालयात परिचारिका होत्या. त्यांच्या कुटुंबात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारे ते पहिले व्यक्ती होते. लीड्स आणि ऑक्सफर्डमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी वकिली केली. स्टार्मर हे फुटबॉलप्रेमी आहेत. ते आर्सेनल क्लबचे चाहते आहेत. तर त्यांच्या पत्नी व्हिक्टोरिया या लंडनच्या ज्यू कुटुंबातील असून त्या आरोग्य क्षेत्रात काम करतात. स्टार्मर दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे.