कॉंग्रेसने कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. विकासाचा दावा करणाऱयांनी आत्तापर्यंत केवळ दोन हजार लोकांना नोकऱया दिल्या असून, अनेक राज्यांतील विकासकामे कॉंग्रेसने रोखून धरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुझफ्फरपूरमध्ये केला. हुंकार रॅलीत मोदी यांनी मुझफ्फरपूरमध्ये बिहारमधील नागरिकांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आलेले लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मोदी म्हणाले, मोदी रोको, हाच कॉंग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. कॉंग्रेससाठी धर्मनिरपेक्षता हे केवळ व्होट बॅंकेचे राजकारण आहे. मात्र, आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे विकासाचा मार्ग आहे. त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे तोडा आणि राज्य करा, असे सूत्र आहे. मात्र, आमच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे जोडा आणि विकास करा, असे धोरण आहे. देशातील कोणत्याही प्रश्नावर कॉंग्रेसकडे उत्तर नाही. केवळ मोदीविरोध हेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र आहे, असाही आरोप मोदी यांनी केला.
एनडीए याचे मला दोन अर्थ अभिप्रेत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, एक म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आणि दुसरे म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट अलायन्स. येणारे दशक हे दलित, पीडित, शोषित यांच्या विकासाचे दशक असणार आहे. शांती, एकता आणि सदभावनेशिवाय देश विकास करू शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.