Modi-Putin On Ukraine War: अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारताने रशियाकडे युक्रेन युद्ध धोरणाबाबत स्पष्टीकरण मागितल्याचा दावा नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, मार्क रुटे यांचा दावा पूर्णपणे निराधार आहे. शुक्रवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, परराष्ट्र मंत्रालयाने भारत आणि रशियामध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले आहे. याचबरोबर, असे दावे करण्यापूर्वी नाटो प्रमुखांनी भविष्यात सावधगिरी बाळगावी असेही म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन युद्धाच्या धोरणावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट चर्चा केल्याचा दावा केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने नाटो प्रमुखांवर जोरदार टीका केली.
परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील कथित फोन संभाषणाबाबत नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांचे विधान आम्ही पाहिले आहे. हे विधान तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आणि पूर्णपणे निराधार आहे. मार्क रुटे यांनी केलेल्या दाव्याबाबत, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी कधीही चर्चा केलेली नाही”, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
काय म्हणाले होते नाटो प्रमुख
गुरुवारी न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वेळी सीएनएनशी बोलताना मार्क रुटे म्हणाले होते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा रशियावर मोठा परिणाम होत आहे. ते म्हणाले की, भारत पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा करत आहे. नरेंद्र मोदी त्यांना युक्रेनवरील त्यांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण मागत आहेत, कारण भारताला अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा फटका बसत आहे.
भविष्यात असे निष्काळजी भाष्य…
रुटे यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करताना, भारताने म्हटले आहे की त्यांना आशा आहे की नाटो प्रमुख भविष्यात सार्वजनिक ठिकाणी बोलताना अधिक जबाबदारीने बोलतील.
“नाटोसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या नेतृत्वाने भविष्यात सार्वजनिक ठिकाणी बोलताना अधिक जबाबदारी आणि अचूकता दाखवावी, अशी आमची अपेक्षा आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांचे चुकीचे वर्णन करणारे किंवा कधीही न घडलेल्या संभाषणांचा संकेत देणारे निष्काळजी भाष्य अस्वीकारार्ह आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.