पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यानंतर पीडित महिलांनी एका तृणमूल काँग्रेस नेत्याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर हे प्रकरण देशभर गाजलं. स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई करण्यासाठी अनेक मोर्चे काढले होते. या मोर्चांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याप्रकरणाची दखल घेतली होती. भाजपाच्या स्थानिक पातळीवरील नेत्या रेखा पात्रा यांनी संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता आणि भाजपाच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. त्याच रेखा पात्रा यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान, मोदी यांनी पुन्हा एकदा संदेशखाली प्रकरणावर भाष्य केलं आहे.

पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथे आज (४ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मोदी म्हणाले, सर्वप्रथम ममता दिदींचे (पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री) आभार मानतो. २०१९ च्या निवडणुकीवेळी याच मैदानातून मी पश्चिम बंगालच्या जनतेला संबोधित करण्यासाठी आलो होतो. त्यावेळी ममता दिदींनी हे मैदान आकाराने लहान करण्यासाठी मैदानाच्या मधोमध एक स्टेज बांधलं होतं. त्यावेळी मी म्हणालो होतो की जनता याचं उत्तर देईल. यावेळी ममता दिदींनी कोणताही अडथळा निर्माण केला नाही. त्यामुळे मला सर्वांना भेटता आलं. गेल्या १० वर्षांत जो विकास झाला तो केवळ एक ट्रेलर होता. आता आपण आणखी पुढे जाणार आहोत.

मोदी यांनी यावेळी संदेशखाली प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, संपूर्ण बंगाल आणि देशाने पाहिलं आहे की, संदेशखाली प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी तृणमूलने त्यांची ताकद पणाला लावली होती. संदेशखालीतल्या महिलांबरोबर जे काही झालं तो तृणमूलच्या अत्याचारांचा कळस होता. भाजपाने ठरवलं आहे की, संदेशखालीच्या गुन्हेगारांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा >> अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी म्हणतोय की देशातून भ्रष्टाचार हद्दपार करा आणि विरोधी पक्ष म्हणतायत भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा. ते म्हणतात मोदींचं काही कुटुंबच नाही. परंतु, संपूर्ण भारत हेच माझं कुटुंब आहे. आम्ही सीएए कायदा आणला. परंतु, विरोधी पक्ष त्या कायद्याबाबत अपप्रचार करत आहेत, लोकांमध्ये असत्य पसरवत आहेत.