चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व शी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी आज चेन्नईला दुपारी बाराच्या रवाना झाले. मात्र मोदींच्या या दौऱ्याला तामिळनाडूमधील नागरिकांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे तामिळनाडूच्या लोकांचा जिनपिंग यांना विरोध नसून केवळ मोदींना विरोध आहे.

#GoBackModi हा हॅशटॅग ट्विटवर सकाळपासूनच टॉप ट्रेण्ड होताना दिसत आहे. मोदी आणि जिनपिंग मामल्लापुरमला जाण्यासाठी रवाना होण्याआधीच सोशल नेटवर्किंगवरुन मोदींना विरोध होताना दिसत आहे. #TNwelcomesXiJinping हा हॅशटॅग वापरुन तामिळनाडू जिनपिंग यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचे अनेकांनी ट्विटवर म्हटले आहे.

मोदी जेव्हा जेव्हा तामिळनाडू दौऱ्यावर जातात तेव्हा ट्विटवर त्यांना विरोध करणार हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसतो. #GoBackModi हा हॅशटॅग या आधीही अनेकदा मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधी ट्विटवर दिसून आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी तामिळनाडूला गेले होते त्यावेळेसही त्यांना विरोध झाला होता. जानेवारी महिन्यामध्ये मोदी यांनी मदुराई येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हाही त्यांना विरोध झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ते चेन्नई येथे आयआयटीमध्ये पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळीही मोदींना विरोध झाला होता.

केवळ भारतातच नाही तर चीनमधूनही मोदींच्या तामिळनाडू भेटीला विरोध होताना दिसत आहे. चीनमध्येही हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. चीनमधील नेटकऱ्यांनी मोदी परत जा या अर्थाचा #回到莫迪 (Huí dào mò dí) हा हॅशटॅग वापरुन मोदींना विरोध करणारे ट्विट केले आहेत. काही तासांमध्ये या हॅशटॅगवर ५३ हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. पाहुयात काही व्हायरल झालेले ट्विट

अनेकांनी यासंदर्भातील कार्टूनही शेअर केली आहेत

मोदी-जिनपिंग भेटीसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

मोदींनी होणारा विरोध पाहता या भेटीपूर्वी तमिळनाडूतील मामल्लपुरम (महाबलीपुरम) शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या सुरक्षेमुळे शहराला अक्षरश: तटबंदी असलेल्या किल्ल्याचे स्वरूप आले आहे. महाबलीपुरमच्या किनाऱ्यावर असलेल्या मंदिरांजवळ तटरक्षक दलाचे एक जहाज तैनात करण्यात आले असून सुरक्षाविषयक उपाययोजनांचा भाग म्हणून तमिळनाडूच्या निरनिराळ्या भागांतून बोलावलेले ५ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी शहरात व शहराभोवती तैनात करण्यात आले आहेत.