शनीचा चंद्र असलेल्या एनक्लेडसच्या पृष्ठभागाखाली वितळलेल्या पाण्याचे महासागर असून तो परग्रहावरील सूक्ष्मजीवांचा स्रोत असू शकतो असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने कॅसिनी अवकाशयान सोडले होते. त्याने शनीच्या एनक्लेडस या उपग्रहाच्या दक्षिण ध्रुवाचे निरीक्षण केले. तेथे बर्फ आहे. तेथे पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा लेक सुपरियर तलावाएवढे पाण्याचे तळे आहे, त्याचा तळ खडकाळ असून तेथे सूक्ष्मजीवांच्या वाढीस अनुकूल स्थिती आहे. एनक्लेडस या शनीच्या चंद्रावर जमिनीखाली सागर असण्याची शक्यता २००५ मध्ये संशोधकांनी वर्तवली होती. दक्षिण ध्रुवावर त्या वेळी पाण्याच्या वाफा बाहेर पडताना दिसल्या होत्या. कॅसिनी प्रकल्पातील वैज्ञानिक लिंडा स्पिल्कर यांनी सांगितले की, एनक्लेडसच्या दक्षिण ध्रुवावर खारट पाणी व कार्बनी रेणू असावेत जे सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक घटक आहेत.
शनीचा हा चंद्र ५०० किलोमीटर रूंदीचा असून स्फटिकाच्या रूपातील बर्फाखाली पाणी असण्याची शक्यता आहे. कालटेक येथील ग्रहविज्ञानाचे प्राध्यापक व संशोधन निबंधाचे सहलेखक डेव्हिड स्टिव्हनसन यांनी सांगितले की, एनक्लेडसची अंतर्गत रचना समजण्यासाठी भूभौतिक पद्धत प्रथमच वापरण्यात आली आहे. तेथील दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे. कॅसिनी यान नासाने इटालियन अवकाश संस्था व युरोपीय अवकाश संस्था यांच्या सहकार्याने २००४ मध्ये सोडले असून त्याने शनीच्या मोठय़ा चंद्रांना भेट दिली होती. शनी हा सूर्यापासून सहावा ग्रह असून त्याच्याभोवती कडी आहेत. त्याला ५३ चंद्र असून नऊ हंगामी चंद्र आहेत ज्यांची निश्चिती झालेली नाही.
या शोधामुळे जीवसृष्टीस अनुकूल असलेल्या सौरमालेतील विभागांची संख्या वाढली आहे. २०१० ते २०१२ या काळात एनक्लेडस या शनीच्या चंद्राच्या गुरूत्व क्षेत्राचा आकार कॅसिनी यानाने निश्चित केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2014 रोजी प्रकाशित
शनीच्या चंद्रावर पाणी असण्याची शक्यता
शनीचा चंद्र असलेल्या एनक्लेडसच्या पृष्ठभागाखाली वितळलेल्या पाण्याचे महासागर असून तो परग्रहावरील सूक्ष्मजीवांचा स्रोत असू शकतो असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
First published on: 05-04-2014 at 05:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa believes underground ocean on saturn planet moon