नासाच्या वैज्ञानिकांनी सूर्याच्या पृष्ठभागावर एक चौकोनी आकाराचे छिद्र असल्याचा शोध लावला आहे. सूर्याच्या या कोरोना म्हणजे प्रभामंडळाच्या भागात हे छिद्र असून तेथून सौरवात सूर्यातून वेगाने बाहेर येतो, असा संशोधकांचा दावा आहे.
   नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्वेटरीने सूर्याच्या या चौकोनी कोरोनल होलची छायाचित्रे टिपली असल्याचे स्पेस डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटले आहे. सूर्याच्या प्रभामंडळात असलेले हे छिद्र काळे भासत असून तेथे प्रकाश अतिनील किरणांच्या स्वरूपात बाहेर टाकला जाण्यासारखी स्थिती नाही असे नासाच्या खगोलवैज्ञानिकांनी व्हिडिओ वर्णनात म्हटले आहे. या छिद्रात काही तेजस्वी अशी वेटोळी दिसतात तेथे सौर चुंबकीय क्षेत्राच्या छोटय़ा तुकडय़ांना गरम प्लाझ्माची बाह्य़कडा आहे.
 सूर्याच्या दक्षिण भागात हे छिद्र असून त्यामुळे सौरवाताचे प्रवाह आपल्या पृथ्वीवर परिणाम करण्याची शक्यता कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. टेक टाइम्सच्या मते हे छिद्र नेमके किती आकाराचे आहे याबाबत वेगवेगळे दावे आहेत, पण ते चौकौनी आकाराचे आहे यावर मतैक्य आहे. हे छिद्र चौकोनीच का आहे याचे एक कारण नसून अनेक कारणे असू शकतात असे वैज्ञानिकांचे मत आहे.