नथुराम गोडसे शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाचा भाग होते, असा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. नथुराम गोडसे हे आजन्म संघाचाच भाग होते आणि ते कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडले नव्हते, अशी माहिती नथुराम गोडसे आणि वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ वृत्तपत्राशी बोलताना दिली. आमच्या कुटूंबाने नथुराम गोडसे आणि वीर सावरकर यांचा महत्त्वपूर्ण लिखित दस्तावेज जपून ठेवला आहे. या दस्तावेजावरून नथुराम गोडसे शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते होते, हेच सिद्ध होते. मात्र, काही प्रसंगांमध्ये संघाने आवश्यक प्रमाणात कणखर भूमिका न घेतल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.
संघापासून कोणता धोका?
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधीच्या हत्येमध्ये संघाचा हात असल्याच्या विधानावर संघाकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवर जोरदार टीका होत आहे. याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या पार्श्वभूमीवर सात्यकी सावरकर यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरू शकते.
नथुराम गोडसे यांनी १९३२ मध्ये सांगली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व स्विकारले. त्यानंतर ते शेवटपर्यंत संघाचे बौद्धिक कार्यवाहक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे गोडसे संघाचा भाग नव्हते, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेबाबत आपण नाराज असल्याचे सात्यकी सावरकर यांनी म्हटले. संघ हत्येच्या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, हे मला मान्य आहे. मात्र, ते सत्य टाळू शकत नाहीत. १९३८-१९३९ या काळात हिंदू महासभेच्या माध्यमातून नथुराम गोडसे यांनी हैदराबादमधील निजामाविरूद्धच्या चळवळीचे नेतृत्त्व केले होते. यामुळे त्यांना तुरूंगातही राहावे लागले होते. नथुरामजी हैदराबादमधील निजामाच्या इस्लामी राजवटीचे कडवे विरोधक होते. संघाने हैदराबादमध्ये राहणाऱ्या हिंदूंना शोधण्याच्या मोहिमेसाठी पाठवलेल्या स्वयंसेवकांच्या पहिल्या तुकडीत नथुराम होते. त्यावेळी त्यांनी हैदराबादमधून अनेक लेख पाठवले. त्यापैकी अनेक लेख वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध झाले. ते सर्व लिखाण आम्ही जपून ठेवले आहे, असे सात्यकी यांनी सांगितले.
महात्मा गांधीच्या हत्येनंतर संघाने मिठाई वाटली होती: काँग्रेस
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2016 रोजी प्रकाशित
RSS: ‘नथुराम गोडसे शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकच होते’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 08-09-2016 at 09:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nathuram godse never left rss says his family