महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्यांमुळे झालीच नाही. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी केला आहे. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी रणजीत सावरकर यांचं मानसिक संतुलन ढळलं असल्याची टीका केली आहे. तसंच नथुराम गोडसेने जेव्हा महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या तेव्हा तिथे प्रत्यक्षदर्शी काकासाहेब गाडगीळ होते. त्यांनी नथुरामला ओळखलं असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. रणजीत सावरकर यांचं पुस्तक म्हणजे नेहरु आणि गांधी यांना बदनाम करण्याचा कट आहे. अशा पुस्तकासाठी महाराष्ट्र सदन दिलंच कसं? असाही प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“रणजीत सावरकर इतिहास तज्ज्ञ आहेत का? पंडित नेहरु आणि महात्मा गांधी यांना बदनाम करण्याचा कट गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. आता तो चांगलाच फोफावला आहे. लोक हुशार आहेत मूर्ख नाहीत. नथुराम गोडसेने महाबळेश्वरला झालेल्या काँग्रेसच्या शिबीरात महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न केला होता. कंबळे गुरुजी तेव्हा उपस्थित होते. त्यांनी नथुरामला आपटून मारलं असतं, मात्र महात्मा गांधी मधे पडले त्यांनी कंबळे गुरुजींना बाजूला केलं आणि सांगितलं की कुणाचा प्राण घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. पाचवेळा महात्मा गांधींची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. ते काय पंडित नेहरुंनी सांगितलं होतं?” असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसंच एक्सवर त्यांनी पोस्टही केली आहे.
हे पण वाचा- “महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीने झालीच नाही, त्यांच्यावर..”, सावरकरांच्या पुस्तकात मोठा दावा
काय आहे जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट?
महात्मा गांधीजींच्या खुनाबाबत संशय निर्माण करणारे पुस्तक दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून, “महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे याने केलीच नाही” , असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर या पुस्तकात जे काही लिहिलंय, त्याकडे पाहिल्यास पुस्तक लिहिणाऱ्या रणजीत सावरकर मानसिक संतुलन ढळले आहे, हेच स्पष्ट दिसून येत आहे. खून झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते; खुनाचा योग्य तपास झाला अन् योग्य सुनावणी झाली. त्यानंतर नथुरामला फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर चढवण्यात आले. नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि काळा डाग आहे. तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत. दुर्देवं हेच आहे की, हे पुस्तक मराठी माणसानेच लिहिलेले आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. महाराष्ट्राने आता तरी जाग व्हावे आणि या नथुरामी प्रवृत्तीला ठेचून काढावे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.
असं नवीन काहीतरी थोतांड निर्माण करायचं आणि राज्यसभेवर जायला आपण योग्य उमेदवार आहोत हे रणजीत सावरकर दाखवू पाहात आहेत. जागतिक बाजारात रणजीत सावरकर जे करत आहेत त्याला मूर्खपणा म्हटला जाईल. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र सदनात अशा पुस्तक प्रकाशनाची संमती कशी मिळते? रणजीत सावरकर यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना विचारा. जगातल्या इतिहासात कुठेही काहीही आलेली नाही. नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. सगळा इतिहास लिहिला आहे. गोळ्या कुणी झाडल्या याचे साक्षीदार होते. काकासाहेब गाडगीळ यांनी नथुरामला ओळखलं होतं. काकासाहेब गाडगीळ यांचं मानसिक संतुलन ढळलं होतं असंही लिहिलं जाईल. असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.