National Herald Case Chargesheet : नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी ९ एप्रिल रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आणि पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसशी संबंधित नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्या मालकीची ६६१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ११ एप्रिल रोजी नोटिसा बजावल्या.

या प्रकाशन संस्थांविरोधात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने शनिवारी दिली.

काँग्रेस प्रवक्त्याची प्रतिक्रिया

“नॅशनल हेराल्डची संपत्ती जप्त करणे म्हणजे शासनाचा मुखवटा पांघरून राज्यप्रायोजित गुन्हा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य लोकांविरोधात दाखल केलेले आरोपपत्र म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून सुडबुद्धीचा आणि धमकावण्याचा प्रयत्न आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आमचं नेतृत्व गप्प बसणार नाही. सत्यमेव जयते!”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ वृत्तपत्र इ.स. २००८ साली बंद पडले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश साम्राज्यशहांना विरोध करण्यासाठी १९३८ मध्ये सुरू केलेले हे काँग्रेसचे मुखपत्र होते. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० साली ते विकत घेतले. यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०१० साली झाली होती. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सर्वात मोठा म्हणजे ७६ टक्के वाटा होता. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र २००८ पासून आर्थिक तोटा होत असल्याचं कारण देत बंद करण्यात आलं होतं. काँग्रेसने पुढे जाऊन ‘एजेएल’ला ९० कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले. पक्षाने सांगितले की, हे पैसे वृत्तपत्राला परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात मदत करण्यासाठी होते. तथापि, वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही आणि एजेएल काँग्रेसचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरले.