आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. जवळपास तीन तास राहुल गांधींची चौकशी सुरु होती. तीन तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. चौकशीत नेमकं काय झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान बाहेर आल्यानंतर राहुल गांधी रुग्णालयात दाखल असलेल्या सोनिया गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते. यानंतर चौकशीच्या दुसऱ्या फेरीसाठी ते पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्याआधी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यानंतर दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

“राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत,” ईडी चौकशीविरोधातील काँग्रेस नेते रस्त्यावर उतरल्याने स्मृती इराणी संतापल्या

राहुल गांधी चौकशीला हजर राहणार असल्याने नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. दिल्लीमध्ये प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांची भेटही घेतली.

नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांची रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी

राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोबत होत्या. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिसऱ्या बॅरिकेडजवळ रोखलं. यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी पुढे गेले असता नेते तिथेच बसून राहिले.

काही वेळाने पोलिसांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि बसमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. प्रियंका गांधी या नेत्यांची भेट घेण्यासाठी तुघलक रोड पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.

पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली असल्याने ही कारवाई करण्यात आली. फक्त दिल्लीच नाही तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश आणि केरळसह इतर ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला असल्याने काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि शशी थरुर यांनी मोदी सरकारला भीती वाटत असल्याचं सांगत निषेध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधकांचं तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आपल्या नेत्यांविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे आणि तथ्यहीन असून हे सूडाचं राजकारण असल्याचा त्यांचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी सोनिया गांधी यांनाही समन्स बजावण्यात आलं आहे. करोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी तपास यंत्रणेकडे वेळ मागितली आहे. यानंतर ईडीने नव्याने समन्स बजावत २३ जूनला हजर राहण्यास सांगितलं आहे. सोनिया गांधींना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.