पीटीआय, नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. भारताच्या रशियामधील दूतावासाने ट्वीट करून ही माहिती दिली. या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरू ठेवण्याविषयी सहमती झाली.
रशियाने सुरक्षा परिषदांचे सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये डोवाल सहभागी झाले. दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ नये, या भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला, तसेच भारत कायम अफगाण नागरिकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही डोभाल यांनी दिली. या बैठकीला भारत आणि रशियासह इराण, कझाकस्तान, किरगिझस्तान. चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित होते.
अजित डोभाल यांचा दोनदिवसीय रशिया दौरा बुधवारी सुरू झाला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तीन महिन्यांपूर्वी रशियाचा दौरा केला होता. त्या वेळी दोन्ही देशांनी रशियाने भारताला पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करण्यासह आर्थिक व्यवहाराचा विस्तार करण्याचे मान्य केले होते. भारतामध्ये लवकरच जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डोवाल यांनी रशियाचा दौरा केला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरही भारत आणि रशियाचे संबंध मजबूत राहिले आहेत. भारताने अद्याप या हल्ल्याचा निषेध केलेला नाही. मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून या संकटावर मात करावी, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. तसेच भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात गेल्या काही महिन्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढली आहे.