मेक्सिकोतील सिनालोआ येथे शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. मेक्सिकन नौदलाचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर कोसल्याने १४ ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये १५ जण होते. या अपघातात १४ जणांना जीव गमवावा लागला. तर जखमीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की अपघाताचे कारण तपासले जात आहे. सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो याच्या अटकेमुळेच हा घातपात घडवल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप नौदलाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरोला अटक केल्यानंतर लगेचच ही घटना घडली. राफेल कारो क्विंटेरो हा एफबीआयच्या यादीतील गुन्हेगारांपैकी एक आहे. मात्र, हेलिकॉप्टर अपघात आणि क्विंटरोच्या अटकेचा काही संबंध असल्याची पुष्टी नौदलाने केलेली नाही.
शुक्रवारी, नौदलाने कुख्यात ड्रग माफिया राफेल कारो क्विंटेरोला पकडले, ज्याला १९८५ मध्ये अमेरिकन अँटी-नार्कोटिक्स अधिकाऱ्याची हत्या आणि छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. किंगपिन १९८० च्या दशकात ग्वाडालजारा कार्टेलचा सह-संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाला, जी लॅटिन अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली ड्रग-तस्करी संघटनांपैकी एक होती.
अमेरिकने या अटकेचे कौतुक केले आणि त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात वेळ वाया घालवणार नाही असे सांगितले. व्हाईट हाऊसचे वरिष्ठ लॅटिन अमेरिका सल्लागार जुआन गोन्झालेझ यांनी सांगितले की, ही खूप मोठी कारवाई आहे.