Operation Sindoor Information Leaked: ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला गोपनीय संरक्षण माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील नौदल मुख्यालयात काम करणाऱ्या एका क्लर्कला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल यादव असे असून, तो हरियाणाचा रहिवासी आहे. तो दिल्लीतील नौदल मुख्यालयात क्लर्क म्हणून काम करतो. त्याच्यावर भारतीय नौदल आणि इतर संरक्षण संस्थांशी संबंधित संवेदनशील पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल यादवने ही माहिती सोशल मीडियावर प्रिया शर्मा नावाच्या एका पाकिस्तानी महिलेला पुरवली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देखील तो ही माहिती पाकिस्तानी महिलेला पुरवायचा. याचा मोबदला म्हणून तो क्रिप्टोकरन्सी स्वीकारायचा.

राजस्थानच्या सीआयडी इंटेलिजेंस युनिटने अनेक महिन्यांच्या देखरेखीनंतर ही अटक केली आहे. वरिष्ठ अधिकारी विष्णुकांत गुप्ता यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दुजोरा दिला की, सीआयडी इंटेलिजेंस युनिट पाकिस्तानशी संबंधित संभाव्य हेरगिरी कारवायांवर लक्ष ठेवून होते.

दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी विशाल यादवचा मोबाईल जप्त केल्यानंतर त्यामध्ये संवेदनशील कागदपत्रे आणि मेसेजेस आढळले, ज्यामुळे त्याने पाकिस्तानला माहिती पुरवल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा तपास करताना अधिकाऱ्यांना असे आढळून आले आहे की, विशाल यादव वारंवार पाकिस्तानी हँडलरच्या ऑनलाइन संपर्कात होता. त्याला ही माहिती पुरवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि थेट बँक ट्रान्सफरद्वारे पैसे मिळत होते.

तपासात असेही आढळले आहे की, आरोपी विशाल यादवला ऑनलाइन गेमिंगचे गंभीर व्यसन होते आणि जुगारात झालेल्या नुकसानीमुळे तो गंभीर आर्थिक अडचणीत होता, ज्यामुळे तो पैशासाठी हेरगिरी करत असावा. सध्या जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात विविध गुप्तचर संस्था त्याची चौकशी करत आहेत.

एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाममध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका परदेशी नागरिकाचाही समावेश होता. यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशनद्वारे पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. गेल्या महिन्याभरात राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि पंजाबमध्ये हेरगिरीशी संबंधित अनेक अटक करण्यात आल्या आहेत.