गेल्या वर्षी पाकिस्तानातील नागरी सरकार व लष्कर यांच्यातील मतभेदाची माहिती प्रसारमाध्यमात फुटल्याने झालेल्या वादावार आता पंतप्रधान नवाझ शरीफ व लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यात समझोता झाला आहे. त्यांनी सामोपचाराने मतभेद मिटवण्याचे ठरवले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘डॉन’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर लष्कर व पाकिस्तान सरकार यांच्यात भारत व अफगाणिस्तानात छुपे युद्ध करणाऱ्या दहशतवादी गटांच्या संदर्भात मतभेद असल्याचे वृत्त दिले होते. लष्कराने याप्रकरणी खेद व्यक्त करून चौकशीचे आदेश दिले होते. आता त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर त्यातील सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा आग्रह लष्कराने धरला आहे. इस्लामी दहशतवादी गटांवर कारवाईत लष्कर कुचराई करीत आहे, असा आरोप पाकिस्तान सरकारने केला होता. त्यावर आधारित बातमी ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिली होती. शरीफ यांनी चौकशीच्या अहवालानंतर त्यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार तारिक फातेमी यांची हकालपट्टी करून जुजबी कारवाई केली, पण त्यावर लष्कराचे समाधान झाले नाही. त्यामुळे लष्कर व पाकिस्तान सरकार यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे असताना लष्करप्रमुख बाजवा व पंतप्रधान शरीफ यांच्या भेटीत परिस्थिती निवळली आहे. जिओ न्यूजने म्हटले आहे की, गुरूवारी दोघांची भेट झाली व त्यात पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे खास प्रयत्न होते. डॉनच्या बातमीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर सामोपचाराने तोडगा काढण्याचे शरीफ व बाजवा यांनी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.