NCERT Book Maratha Empire Map : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) नवीन पुस्तकं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहेत. एनसीईआरटीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या पुस्तकातील काही बदलांवर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. तसेच जैसलमेरच्या राजघराण्यातील सदस्य चैतन्य राज सिंह यांनी या पुस्तकातील मराठा साम्राज्याच्या नकाशावर आक्षेप घेतला आहे. चैतन्य यांचं म्हणणं आहे की पुस्तकातील नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दर्शवण्यात आलं असून हे पूर्णपणे चुकीचं आहे.

चैतन्य राज सिंह यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकात (घटक ३, पृष्ठ क्रमांक ७१) एक नकाशा असून या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवलं आहे. ही बाब इतिहासाबाबत दिशाभूल करणारी, तथ्यहीन व आक्षेपार्ह आहे.”

“आमच्या पूर्वजांच्या बलिदानाचं, सार्वभौमत्त्वाचं व शौर्याचं अपमानास्पद चित्रण”

सिंह म्हणाले, “एनसीईआरटीसारख्या संस्थेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारची अप्रमाणित व ऐतिहासिक पुराव्यांविना दिलेली माहिती ही संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा गोष्टी आपल्या गौरवशाली इतिहासावर व जनभावनेवर आघात करतात. ही केवळ एका पाठ्यपुस्तकातील चूक नाही. आमच्या पूर्वजांच्या बलिदानाचं, सार्वभौमत्त्वाचं व शौर्याचं अपमानास्पद चित्रण असल्याचं यातून भासत आहे.”

जैसलमेरवर कधीही मराठ्यांचा प्रभाव नव्हता : चैतन्य राज सिंह

“जैसलमेर संस्थानासंदर्भात उपलब्ध अधिकृत व ऐतिहासिक माहिती व स्त्रोतांमध्ये मराठ्यांच्या अधिपत्याचा, आक्रमणाचा, मराठ्यांनी कर आकारल्याचा किंवा मराठ्यांच्या जैसलमेरवरील प्रभावाचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही. आउलट शासकीय दस्तऐवजांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जैसलमेरवर कधीही मराठ्यांचा प्रभाव नव्हता.”

“केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. मी संपूर्ण जैसलमेरच्या वतीने प्रधान यांना विनंती करतो की त्यांनी एनसीईआरटीने केलेली चूक दुरुस्त करून घावी. ही चूक हेतूपुरस्पर, पूर्वग्रहदूषित व संभाव्य अजेंडा असल्याचं जाणवतंय. तातडीने व गंभीर्याने या गोष्टीची दखल घेऊन सदर चूक दुरुस्त करावी.”

“राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या प्रामाणिकपणाचं रक्षण करण्याची गरज”

चैतन्य राज सिंह म्हणाले, “ही केवळ ऐतिहासिक तत्थ्यांमधील दुरुस्तीची बाब नसून आपल्या ऐतिहासिक गौरवाचं, स्वाभिमानाचं व राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या प्रामाणिकपणाचं रक्षण करण्याची गरज आहे. याप्रकरणी लवकरात लवकर ठोस व प्रभावी कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे.”