चीनचा गलवान खोऱ्यावरील दावा भारताने फेटाळून लावला आहे. तरीही चीनकडून सातत्याने गलवान खोरे चीनचेच असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर टीका करत चीनला उत्तर द्यावंच लागेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

“चीनने शुक्रवारी गलवा खोरे आपल्याच हद्दीत असल्याचा नवा दावा केला आहे. तसंच भारतीय लष्करानं सीमा ओलांडली असाही दावा केला आहे. मोदीजी आपल्या भूभागावर चीन सरळ सरळ हक्क सांगतोय. चीनला उत्तर द्यावे लागेल. गलवान खोरे आमचे आहे आमचेच राहील,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं.

आणखी वाचा- “जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं?”; राहुल गांधींकडून पंतप्रधानांची ‘प्रश्न’कोंडी

पंतप्रधानांच्या निवेदनावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. “जर कुणी सीमेत घुसलं नाही. कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही, मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची?”, असा प्रश्न आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.

आणखी वाचा- चीनची घुसखोरी नाहीच!

प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात अचानक संघर्ष उफाळून आला. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले असून, भारतात संतप्त भावना व्यक्त होत आहे. सीमेवरील तणावावरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकार कोडींत पकडण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावत चिनी सैन्यानं घुसखोरी केली नसल्याचं सांगितलं.