लोकशाहीवरचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.परंतु देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट संदर्भातील याचिका फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हीव्हीपॅट व निवडणूक मशीन यात तफावत होण्याची शक्यता असतानाही निवडणूक आयोगाकडून यावर मार्ग काढण्यात आलेला नाही, अशी खंतही नवाब मलिक यांनी व्यक्त केली. यामधून निवडणुकीच्या निकालादरम्यान घोळ होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत, अशी शंकाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली. याबाबत न्यायालयात दाद मागणे हा आमचा अधिकार असून लोकांमध्ये जनजागृती करणे ही आमची जबाबदारी असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

९ हजार कोटींचा खर्च करून व्हीव्हीपॅट यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याबाबत लोकांच्या मनात शंका असल्यास ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे मात्र हे सरकार यात सक्रीय नाही, असेही नबाव मलिक म्हणाले.