राज्यातील सरकार चालवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र असून २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात तिन्ही पक्ष निवडणुकीत एकत्र काम करतील असं वक्तव्य केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार निर्माण झालं असून लोकहितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी हित असो किंवा करोनाचं व्यवस्थापन…सरकारच्या कामगिरीवर सामान्य माणूस समाधानी आहे असा दावा यावेळी त्यांनी केला.

भविष्यातही महाविकास आघाडी!

“नाना पटोले यांनी त्यांचा पक्ष पुढील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. कोणालाही एखाद्या पदाची अपेक्षा करण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तसंच पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावं लागतं,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

“…तर सत्ता भ्रष्ट होते,” शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे, असंही ते म्हणाले तसंच किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांनी काय म्हटलं होतं –
“राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करीत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील,” असा विश्वाास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहील, असं सूतोवाच केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab malik shivsena congress 2024 state assembly lok sabha election sgy
First published on: 14-06-2021 at 07:52 IST