लोकनीती- सीएसडीएसच्या पाहणीत जनता दल प्रणित आघाडीला ४२ तर रालोआला ३८ टक्के मते मिळण्याचे भाकीत; शेवटच्या क्षणी मतदारांचे परिवर्तन ?
बिहारच्या निवडणूक निकालांबाबत लावले जाणारे अंदाज रविवारी निकालांसोबत संपुष्टात येणार असतानाच, लोकनीती- सीएसडीएसने‘इंडियन एक्स्प्रेस’साठी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात निकालांचे पारडे महाआघाडीच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या काही आठवडे आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बिहारमधील निवडणुकीच्या दौडीत पुढे होती. लोकनीती- सीएसडीच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात एनडीए महाआघाडीवर ४ टक्क्यांची आघाडी घेणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पाच आठवडय़ांच्या प्रचार मोहिमेने लहान, परंतु महत्त्वाचा बदल घडवून आणल्याचे दिसत आहे. एकीकडे एनडीएची घसरण झाली असून महाआघाडीने गती घेऊन एनडीएवर आघाडी घेतली आहे.
निवडणुकोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, महाआघाडीला एनडीएपेक्षा ४ टक्क्यांची आघाडी मिळाली आहे. महाआघाडीला जवळपास ४२ टक्के मिळतील, तर एनडीए सुमारे ३८ टक्के मते मिळवून तिच्या मागे राहील. लहान पक्ष आणि अपक्ष यांना एकत्रितरीत्या सुमारे २० टक्के मिळण्याचा अंदाज आहे.
निवडणुकोत्तर सर्वेक्षण ६० विधानसभा मतदारसंघांत पसरलेल्या २४० ठिकाणी करण्यात आले. यात ३९३९ मतदारांची मुलाखत घेण्यात आली. सुमारे पाच आठवडय़ांच्या काळात लोकांची पसंती कशी बदलली, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. या प्रश्नाचे सगळ्यात स्पष्टपणे दिसणारे उत्तर ‘प्रचार मोहीम’ हे आहे. ही निवडणूक निर्णायक व महत्त्वपूर्ण प्रचारासाठी ओळखली जाईल. दोन्ही सर्वेक्षणांच्या निष्कर्षांमधील फरक यासाठीही आहे की, अनेक लोकांनी कुणाला मत द्यायचे याबाबतचा निर्णय ऐनवेळी घेतला. एक चतुर्थाश मतदारांनी मतदानाच्या दिवशी, किंवा त्याच्या एक-दोन दिवस आधी आपले मत निश्चित केले, तर १५ टक्के लोकांनी उमेदवारांना पाहिल्यानंतरच कुणाला मत द्यायचे ते ठरवले.
अलीकडच्या काळात झालेल्या कुठल्याही निवडणुकीत इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदारांनी मतदानाबाबतचा निर्णय अगदी शेवटच्या वेळी घेतल्याचा प्रकार अभावानेच घडला आहे. मतदारांच्या मतांमध्ये ऐनवेळी झालेल्या या बदलाचा फायदा महाआघाडीला झाल्याचे सर्वेक्षणात आढळले.
अनेक प्रकारे ही अनेक विरोधाभासांची निवडणूक ठरली आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात नोंदवलेल्या निष्कर्षांनुसार, महाआघाडीची सुरुवात नितीश कुमार यांच्याबाबतच्या सद्भावनेने झाली. याचवेळी, एनडीएच्या प्रचाराचा आधारस्तंभ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली.
चाचणीतील काही निष्कर्ष
* लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला जद(यू)पेक्षा अधिक जागा मिळवण्याची दाट शक्यता आहे.
* या निवडणुकीत नवे जातीय समीकरण उदयाला आले आहे- एकीकडे यादव आणि कुर्मी, तर दुसरीकडे अतिमागासवर्गीय घटक.