Flashback 2022 : काही दिवसांत २०२२ हे वर्ष संपणार आहे. वर्षाअखेर आपण यंदाच्या वर्षात घडलेल्या घटनांच्या आठवणींना उजाळा देतो. तसेच, २०२२ साली माध्यम क्षेत्रातही बरीच उलथा-पालथ झाली आहे. यावर्षी टीव्ही पत्रकारीतेतील अनेक अँकर्स चर्चेत राहिले आहेत. त्यामध्ये ‘एनडीटीव्ही’चे माजी अँकर रवीश कुमार पासून ‘आज तक’चे सुधीर चौधरी यांचा समावेश आहे. तर, आपण चर्चेत असणाऱ्या अन्यही अँकरबद्दल जाणून घेणार आहोत.

रवीश कुमार

यंदा सर्वात चर्चेत असलेल्या अँकरमध्ये रवीश कुमार यांचं नाव पहिल्यांदा येत. २०२२ साली रवीश कुमार दोन कारणांनी चर्चेत राहिले. पहिले म्हणजे रवीश कुमार यांच्यावर एक चित्रपट बनला. त्याचं नाव ‘वाइल्ड वी वाच्ड’ ( नमस्कार मी रवीश कुमार ) असं होते. हा चित्रपट देशासह विदेशातही प्रदर्शित झाला होता. दुसरे कारण रवीश कुमार यांनी ‘एनटीव्ही’चा राजीनामा दिला आहे. २७ वर्ष ‘एनडीटीव्ही’माध्यम समुहात काम करत असलेल्या रवीश कुमार यांनी ३० नोव्हेंबरला आपला राजीनामा दिला होता.

हेही वाचा : Flashback 2022: यावर्षी ‘या’ सरकारी योजना झाल्या जाहीर; पाहा यादी

सुधीर चौधरी

सुधीर चौधरी हे ‘झी’ माध्यम समुहाचा प्रसिद्ध चेहरा होता. ‘झी न्यूज’वर त्यांचा डीएनए हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध होतं. पण, यावर्षी सुधीर चौधरी यांनी ‘झी न्यूज’ला रामराम ठोकत ‘आजतक’साठी काम करण्यास सुरुवात केली आहे. सुधीर चौधरी यांनी ‘झी न्यूज’ सोडणे आणि ‘आजतक’मध्ये काम करणे, हे दोन्ही चर्चेचा विषय ठरला होता.

रोहित रंजन

‘झी न्यूज’ अँकर रोहित रंजनही यावर्षी चर्चेत राहिले होते. राहुल गांधी यांनी वायनाड येथे काँग्रेस हल्ल्याबाबत भाष्य केलं होतं. मात्र, रोहित रंजन यांनी ते उदयपूर मध्ये झालेल्या खून प्रकरणाशी जोडलं. राहुल गांधींनी उदयपूर खून प्रकरणातील आरोपींना ‘लहान’ म्हणत आणि त्यांना सोडण्याची मागणी केली, असं रोहित रंजन यांनी सांगितलं. यानंतर रोहित रंजन यांच्यावर काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाविका कुमार

‘टाइम्स नाउ नवभारत’च्या अँकर नाविका कुमार यांनीही राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. पंजाबमधील राजकीय परिस्थितीवर बोलताना नाविका कुमार यांनी राहुल गांधींबद्दल विधान केलं होतं. नाविका कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होते. नंतर नाविका कुमार यांनी लाइव्ह कार्यक्रमात माफी मागावी लागली होती.

अमन चोप्रा

अमन चोप्रा हे ‘न्यूज १८ हिंदी’मध्ये अँकर म्हणून काम करतात. अमन चोप्रा यांनी आपल्या कार्यक्रमात बोलताना दावा केलेला, दिल्लीतील जहांगीरपुरी केसचा बदला घेण्यासाठी राजस्थानच्या अलवरमधील सर्वात जुन्या धार्मिक स्थळाला पाडण्यात आलं होतं. अमन चोप्रा यांच्या विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : Flashback 2022 : ठाकरे सरकार, शिवसेनेतील बंड ते शिंदे-फडणवीस सरकार, २०२२ मधील राजकीय उलथापालथीचा आढावा…

लिसा लाफ्लेम्स

भारताबाहेरील विचार केला तर कॅनडाच्या टीव्ही अँकर लिसा लाफ्लेम्स या खूप चर्चेत राहिल्या. झालं असं की, ऑगस्ट महिन्यात एक दिवशी आपल्या केसांना न कलर करता आल्या होत्या. पांढऱ्या केसांमध्येच त्यांनी बातम्या वाचल्या. याबद्दल टीव्ही समुहाने त्यांना कामावरून काढून टाकले. लिसा यांना कामावरून काढल्यावर त्यांची जगभरातील माध्यमांत चर्चा झाली होती.