जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल ही अत्यंत चिंताजनक बाब ठरली असून त्यामुळे भारताचे कार्बन उत्सर्जनाचे (कार्बन फूटप्रिण्ट) प्रमाण कमी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
आपल्या देशात ५० टक्क्य़ांहून अधिक ऊर्जानिर्मिती कोळशाच्या माध्यमातून होते आणि त्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. यामुळे तंत्रज्ञानावर आधारित नवीन शोध लावून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. तिरुचिरापल्लीजवळ असलेल्या तिरुमयम् या शहरातील भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडचा उच्चस्तरीय औष्णिक प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रास समर्पित करण्यात आला. स्वच्छ कोळसानिर्मितीसाठी ‘अल्ट्रा सुपर क्रिटिकल’ तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ‘भेल’ने घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनमोहन सिंग यांनी आनंद व्यक्त केला. १३व्या योजनेअखेरीस २० हजार मेगाव्ॉट ऊर्जानिर्मितीची क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशनने समोर ठेवले असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.