Dutch author Adjiedj Bakas on Jawaharlal Nehru, Narendra Modi: भारताचे भविष्य हे त्याच्या सुप्त शक्तीत आहे जसे की, योग, खाद्यपदार्थ, अध्यात्म आणि संस्कृती, असे विधान प्रसिद्ध डच लेखक अदजीएज बकास यांनी केले आहे. भू-राजकीय रणनीतीकार विन्को डेव्हिड यांच्यासह सह लेखन केलेल्या #Forwardism या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बकास मागच्या आठवड्यात मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी भारताबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. “अमेरिकेने केवळ सैन्याच्या जोरावर जगावर नियंत्रण मिळवले असे नाही, ती त्यांची सुप्त शक्ती होतीच. पण हॉलिवूड, फॅशन इत्यादीनेही अमेरिकेला वर आणले. त्याचप्रमाणे भारताकडेही जगाला देण्यासारखे योग, ध्यान, संस्कृती, फॅशन, चित्रपट आणि संगीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत”, असे बकास म्हणाले.
तसेच जग आता अधिकाधिक शाकाहाराला पसंती देऊ लागले आहे. अशावेळी भारताला जगावर आपला प्रभाव टाकण्याची मोठी संधी आहे. भारताकडे शाकाहारी जेवण पद्धतीची मोठी परंपरा आहे. रिसीपीजची जणू खाणच भारताकडे आहे, असेही ते म्हणाले.
भारताच्या प्रगतीचा उल्लेख करत असताना बकास यांनी विकासाचे काही टप्पे विशद केले. ते म्हणाले, “भारत दिवसेंदिवस बळकट होत चालला आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताला उभे केले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला काम करायला लावले आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला धावायला लावत आहेत.”
मुंबई आणि दुबई दरम्यान ट्रेन सुरू केली तर…
मूळ भारतीय वंशाचे असलेले बकास हे जागतिक पातळीवर भविष्यवेत्ता आणि ट्रेंडवॉचर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर ४० हून अधिक पुस्तकांचे सहलेखन केले आहे. या कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले, न्यूयॉर्क आणि लंडन हे ग्लोबल नॉर्थचे दोन आर्थिक केंद्र आहेत. याप्रमाणेच ग्लोबल साऊथ मधील दुबई आणि मुंबई यांच्यादरम्यान जर रेल्वे प्रकल्प उभारल्यास या दोन शहरांतील प्रवास अवघ्या ३० मिनिटांत शक्य होईल. ग्लोबल साऊथचे आर्थिक केंद्र म्हणून ही दोन शहरे काम करू शकतील.

आध्यात्मिक क्षेत्रातही भारताचा ठसा
बकास पुढे म्हणाले की, आध्यात्मिक क्षेत्रातही भारत प्रासंगिक आहे. युरोपमधील जेन झी आता आता देवाकडे वळत आहे. भारताला मोठा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. त्यांनी तो जगाला द्यावा. भारतात आध्यात्मिक पर्यटन जोरात चालू शकते, याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्णाची द्वारका पुन्हा उभी करावी. गौतम बुद्धांनी भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य केले. येशू ख्रिस्त यांनीही २० वर्ष भारतात घालवली होती.
उत्तर प्रदेश ते दक्षिण अमेरिका प्रवास
बकास पुढे म्हणाले की, या पुस्तकाच्या निमित्ताने माझी भारतात घरवापसी झाली आहे. माझे पूर्वज हे उत्तर प्रदेशमधील बरेलीचे होते. १८७० मध्ये जेव्हा अमेरिकेत गुलामगिरीचा बिमोड झाला तेव्हा ते दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम येथील डच कॉलनीत स्थलांतरीत झाले. तिथे शेतीसाठी मजुरांची गरज होती.
बकास पुढे म्हणाले की, मला भारताचे भविष्य स्पष्टपणे दिसत आहे. पुढील काळात भारताची भरभराट होईल. १८२० मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होता. इतिहासाची पुनरावृत्ती लवकराच होणार असून या किंवा पुढील वर्षी भारत हे स्थान पुन्हा प्राप्त करेल.