दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषाविरोधात लढणारे ज्येष्ठ नेते नेल्सन मंडेला यांच्यावर तीन महिने रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना रविवारी सकाळी घरी पाठविण्यात आले. फुप्फुसाच्या संसर्गाने आजारी असलेले ९५ वर्षांचे मंडेला यांची प्रकृती नाजूकच असून त्यांच्यावर घरीही अतिदक्षता विभागातील उपचार करण्यात येतील.
मंडेला यांच्यावर येथील प्रिटोरिया रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आता घरी पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती झपाटय़ाने सुधारावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देत आहोत, असे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी सांगितले. मंडेला यांची प्रकृती तशी अस्थिरच असून त्यांना रुग्णालयात जसे उपचार मिळत होते, तसेच उपचार घरीही मिळण्यासंबंधी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची खात्री पटली आहे, असे झुमा यांचे प्रवक्ते मॅक महाराज यांनी सांगितले. मंडेला यांना फुप्फुसाच्या संसर्गाने ग्रासल्यामुळे त्यांना गेल्या आठ जून रोजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.