नेपाळमध्ये मदतकार्यासाठी गेलेल्या व नंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकी हेलिकॉप्टरमधील आठ सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. अमेरिकी नौदलाचे हेलिकॉप्टर मंगळवारच्या भूकंपानंतर मदतीसाठी गेले असता कोसळले होते. मंगळवारच्या भूकंपानंतर १३६ धक्के बसले आहेत.
नेपाळी लष्कराच्या मदत पथकाला अमेरिकेचे यूएच १ ह्य़ू नावाचे हेलिकॉप्टर सिंधुपालचौक जिल्ह्य़ात गोरठाली खेडय़ात कोसळलेले दिसले. त्याचे अवशेष सापडले आहेत. काल तीन मृतदेह सापडले होते, आज पाच मृतदेह सापडले आहेत. हेलिकॉप्टर व्हिएतनाम युद्धाच्या काळातले होते. ते ११२०० फूट उंचीवर असताना कोसळले. सर्व मृतदेह जळालेले असल्याचे नेपाळी लष्कराने म्हटले आहे. लष्कराचे प्रवक्ते जगदीश पोखरेल यांनी सांगितले की, उर्वरित मृतदेह काठमांडूला पाठवण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये नेपाळचे दोन जवान व अमेरिकेचे सहा नौसैनिक होते. चारिकोट व दोलखा येथे मदतकार्यासाठी ते चालले होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेचे कारण समजलेले नाही. चालकाने दरडींपासून वाचण्यासाठी हेलिकॉप्टर भीतीने उंच नेले पण तेथे धुके असल्याने ते कोसळले.
दरम्यान नेपाळमध्ये भूकंपाचे अजून सात धक्के बसले असून त्यांची तीव्रता ४ रिश्टरच्या आसपास होती. दरम्यान मंगळवारच्या भूकंपातील मृतांची संख्या १३६  व जखमींची संख्या २९५६ झाली आहे. ललितपूर मकवानपूर येथे केंद्र असलेला भूकंप ४.२ रिश्टरचा होता. हा धक्का सकाळी ९.३५ वाजता बसला तर ९.२४ वाजता दुसरा भूकंप झाला. त्याचे केंद्र काठमांडूच्या पूर्वेला १०० कि.मी अंतरावर सिंधुपालचौक येथे होते. पहाटे २ व सकाळी साडेसहा दरम्यान ४ ते ४.१ रिश्टरचे पाच लहान धक्के बसले, त्यांची केंद्रे गोरखा, धाडिग, दोलखा, नुवाकोटा जिल्ह्य़ात होती, असे नॅशनल सिसमॉलॉजिकल सेंटरने म्हटले आहे. दरम्यान २५ एप्रिलच्या भूकंपानंतर २३० धक्के नोंदले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal earthquake us marine chopper destroyed in crash no survivors
First published on: 17-05-2015 at 02:19 IST