“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असं वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी काही दिवसांपूर्वी केलं होते. “भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे, असंही ओली म्हणाले होते. मात्र आता या वक्तव्यानंतर नेपाळच्या पुरातत्व विभागाने पंतप्रधानांचा दावा खरा असल्याचे सिद्ध करण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नेपाळच्या पुरातत्व विभागाने लवकरच श्री रामाच्या नेपाळमधील जन्मस्थानासंदर्भातील अभ्यास आणि संशोधनाचे काम हाती घेणार असल्याची घोषणा केली आहे. “एक जबाबदार संस्था म्हणून नेपाळचे पुरातत्व विभाग काम करतो. मागील अनेक वर्षांपासून हा विभाग देशातील सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी उत्खनन, संशोधन आणि अभ्यास करत आला आहे,” असं नेपाळच्या पुरातत्व विभागाचे महासंचालक दामोदर गौतम यांनी सांगितलं. आता पंतप्रधानांनीच भगवान रामाच्या जन्मासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर यासंदर्भात पुरातत्व विभागाला मागे फिरता येणार नसल्याचे गौतम यांनी सांगितलं.

नक्की पाहा >>  “अयोध्याच काय न्यूयॉर्क, रशिया, ऑस्ट्रेलिया, पॅरिस, लंडनही नेपाळचाच भाग”; ओली झाले ट्रोल

“पुरातत्व विभाग इतिहास अभ्यासक, संस्कृतीसंदर्भातील तज्ज्ञ, धार्मिक नेता, प्राध्यापक आणि संशोधकांसोबत एक सामुहिक कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमामध्ये यासंदर्भातील सर्व तज्ज्ञांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर उत्खनन कोणत्या ठिकाणी करण्यात यावे यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल,” अशी माहिती गौतम यांनी दिली. मात्र पंप्रधानांनी केलेल्या दाव्यानुसार आता तातडीने बारा येथील थोरी गावाजवळ उत्खनन करण्यात येणार नसल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केलं आहे. नेपाळमधील बारा, धौंसा आणि चितवन जिल्ह्यामधील नदी किनाऱ्या जवळच्या मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्याची माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे.

“या भागामध्ये प्राचीन मानवी संस्कृती होती यासंदर्भातील ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र या भागामध्येच अयोध्या होती असा दावा करणारे पुरावे सध्या तरी आमच्याकडे नाहीत,” अशी कबुलीही नेपाळच्या पुरातत्व विभागाने दिली आहे.