नेस्ले कंपनीने मॅगी नूडल्सचे उत्पादन तीन महत्त्वाच्या प्रकल्पात सुरू करण्यात आले असून इतर ठिकाणी उत्पादन सुरू करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. नेस्लेने मॅगी नूडल्सचे उत्पादन नानजानगुड (कर्नाटक), मोगा (पंजाब) व बिचोलिम (गोवा) येथे सुरू केले आहे.

नेस्ले कंपनीने म्हटले आहे, की आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व नमुने प्रमाणित प्रयोगशाळांकडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्या चाचण्या झाल्यानंतरच मॅगीची विक्री सुरू केली जाईल.
शेअर बाजाराने कंपनीकडून मॅगी नूडल्सचे उत्पादन पुन्हा सुरू करण्याबाबतच्या बातम्यांवर कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले होते. कंपनीच्या एका प्रवक्तयाने सांगितले, की तीन राज्यांत मॅगीचे उत्पादन सुरू केले आहे. नेस्ले इंडिया या कंपनीला शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त असल्याने मॅगी नूडल्स बाजारात विकण्यास बंदी घालण्यात आली होती. जून महिन्यात काही चाचण्यात नमुने सदोष आढळल्याने मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. मॅगी खाण्यास घातक असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते. नेस्ले इंडिया कंपनीला या प्रकरणात साडेचारशे कोटींचा फटका बसला असून ३० हजार टन मॅगी कंपनीकडून नष्ट करण्यात आली होती. ग्राहक कामकाज मंत्रालयाने नेस्ले इंडियाकडे ६४० कोटींची भरपाईही मागितली होती. मॅगी बंदीमुळे ३० जून २०१५ अखेरीस मॅगीला तीन महिन्यात ६४.४० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. जो तीस दशकात सर्वाधिक होता. एप्रिल ते जून २०१४-१५ दरम्यान २८७.८५ कोटी रुपयांचा नफा झाला होता.