New IRCTC train ticket rules: भारतीय रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीनं रेल्वे तिकीट बुकिंग संदर्भात केलेल्या बदलांचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे. हे बदल येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. १ ऑक्टोबर २०२५ पासून रिझर्व्हेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांमध्ये तेच यूजर्स ऑनलाईन तिकीट बुकिंग करु शकतात ज्यांचं आधार वेरिफिकेशन झालेलं आहे. हा नियम आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपसाठी लागू असेल. रेल्वे मंत्रालयाच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, या उपाययोजनाचा उद्देश खऱ्या वापरकर्त्यांना आरक्षण प्रणालीचे फायदे मिळतील याची खात्री करणे आणि अनधिकृत व्यक्तींकडून होणारा गैरवापर रोखणे हा आहे.
भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काउंटरवर सामान्य राखीव तिकिटे बुक करण्याचे सध्याचे वेळापत्रक अद्यापही बदललेले नाही. मात्र, अधिकृत रेल्वे तिकीट एजंट्सना सुरुवातीच्या दिवसाच्या आरक्षित तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी सध्याची १० मिनिटांची मर्यादा कोणत्याही बदलाशिवाय लागू राहील, असे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रेल्वेनं १ जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केलं होतं. आता रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक केलं आहे. रेल्वेचा हा निर्णय तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावं यासाठी करण्यात आलं आहे. काही एजंट तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीनं तिकीट बुक करतात. ज्यामुळं सामान्य यूजर्स किंवा प्रवाशांना तिकीट बुक करता येत नाही. आता आधार वेरिफिकेशनमुळं प्रवासी तिकीट बुक करु शकेल.
रेल्वेनं सेंटर फॉर रेल्वे इन्फॉरमेशन सिस्टीम्स आणि आयआरसीटीसीला तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. यासह प्रवाशांना नव्या नियमांची माहिती देण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयानं याबाबत परिपत्रक सर्व विभागांना पाठवलं आहे. रेल्वेनं घेतलेल्या या निर्णयामुळं ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल. ज्या यूजर्सला एजंटस मुळं कन्फर्म तिकीट मुळत नाही त्यांना दिलासा मिळणार आहे. आधार लिंकिंगमुळं प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत तिकीट बुक करता येईल. यामुळं ई-तिकिटिंग सुरक्षित होईल.