राजधानीतील जुन्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन येत्या १५ दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, त्यानंतर नव्या महाराष्ट्र सदनातील कॅंटिन बंद होण्याची शक्यता आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ या बचतगटाकडून सध्या नव्या महाराष्ट्र सदनात कॅंटिन सुविधा पुरविली जाते. ‘चपाती’ प्रकरणानंतर आयआरसीटीसीने नव्या महाराष्ट्र सदनातील सेवा बंद केल्यावर महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाकडून सेवा पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने जुन्या महाराष्ट्र सदनात कॅंटिन सेवा देण्यासंदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळाशी करार केला आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत जुन्या सदनातील कॅंटिन सुरू झाल्यावर या बचतगटाकडून तिथे खानपान सेवा सुरू करण्यात येईल. त्यानंतर नव्या महाराष्ट्र सदनातील ही सेवा बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र सदनातील कॅंटिन चालविण्यासाठी एकाही मराठी व्यावसायिकाने उत्सुकता दाखविली नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच सांगितले. या सदनातील कॅंटिन चालविणाऱयांसाठी घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याचे समजते. जुन्या महाराष्ट्र सदनात संबंधित व्यावसायिकाला केवळ एक लाख रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवावे लागतात. मात्र, नव्या सदनातील कॅंटिनसाठी पाच लाख रुपये अनामत रक्कम ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.