लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी एका नवदाम्पत्याचा करुण अंत झाला आहे. लग्नाचा ग्रॅण्ड सोहळा आटोपल्यानंतर नव वधू-वर आपल्या खोलीत गेले. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही बाहेर न आल्याने घरातल्यांनी खोलीत पाहिलं असता दोघेही मृतावस्थेत पडले होते. लखनौमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या दोघांच्या शवविच्छेदनाचा अहवालही समोर आला आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रताप यादव (२४) आणि त्याची पत्नी पुष्पा यादव (२२) यांचं मंगळवारी लग्न झालं. त्यांच्या प्रथेप्रमाणे मंगळवार, बुधवार असे दोन दिवस ग्रॅण्ड लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर, बुधवारी रात्री दोघेही त्यांची मधुचंद्राची रात्र साजरी करण्याकरता एका खोलीत गेले. परंतु, गुरुवारी सकाळी हे नवदाम्पत्य त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. लखनौमध्ये केसरगंज पोलीस ठाण्यात अंतर्गत असलेल्या गोधिया गावात हा प्रकार घडला. या दाम्पत्याचा मृत्यू बुधवारी रात्रीच झाला असल्याचा अहवाल पोस्टमार्टममधून आला आहे. म्हणजेच, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचा मृत्यू झाला आहे.

व्हेंटिलेशनचा अभाव

कैसरगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “शुक्रवारी रात्री मिळालेल्या दोन्ही मृतदेहांच्या पोस्टमार्टम अहवालात या दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सिद्ध झाले आहे. मंगळवारी रात्री प्रतापचे पुष्पासोबत लग्न झाले होते आणि बुधवारी सायंकाळी वरात प्रतापच्या घरी परतली. बुधवारी दोन दिवसांच्या विवाह सोहळ्यानंतर हे जोडपे झोपायला गेले होते, तर कुटुंबातील इतर सदस्य इतर खोलीत झोपले होते. गुरुवारी दुपारपर्यंत दोघेही खोलीतून बाहेर न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.” काही इतर स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनी असे सांगितले की, “ज्या खोलीत हे जोडपे मृत आढळले त्या खोलीत व्हेंटिलेशन नव्हते. त्यामुळे झोपेत असताना गुदमरल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा असा संशय आहे.”

मृत्यूमागील कारणांचा शोध सुरू

“दाम्पत्याच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे कोणतीही गुन्हेगारी कृती नाही. तर, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. आम्ही आता या जोडप्याने त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी केलेल्या प्रत्येक गोष्टीची टाइमलाइन तयार करत आहोत. त्यांनी बुधवारी काय खाल्ले याचीही आम्ही यादी करत आहोत. याशिवाय, त्यांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांची एक टीम खोली आणि परिस्थितीची तपासणी करत आहे,” निरीक्षक पुढे म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New married couple died due to heart attack after grand wedding sgk
First published on: 05-06-2023 at 15:20 IST