Video : सरकारने दोन वर्षांपूर्वी पीओकेत केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे नवे व्हिडीओ पहा…

भारतीय सैन्याने दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक केले होते.

सर्जिकल स्ट्राइक
भारतीय सैन्याने दोन वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी देशाच्या निडर कमांडोंनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. पाकविरोधातील सैन्याच्या त्या मोठ्या कारवाईचे दोन नवे व्हिडीओ गुरुवारी (२७ सप्टेंबर) वृत्तसंस्था एशिअन न्यूज इंटरनॅशनलने (एएनआय) प्रसिद्ध केले.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकशी संबंधीत पहिल्या व्हिडीओमध्ये टार्गेट एरिया दाखवण्यात आला आहे. जेथे दहशतवाद्यांनी आपले दोन लॉन्च पॅड बनवले होते. ज्याच्या जवळच पाकिस्तानी सैन्याची चौकी देखील होती. टार्गेट एरियावर हल्ल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार स्फोट झाले. हे स्फोट या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहेत.


दरम्यान, या सैन्याच्या कारवाईशी संबंधी दुसऱ्या एका व्हिडीओत पाकिस्तानी सैन्याच्या चौकीजवळील टार्गेट एरियाला जवळून दाखवण्यात आले आहे. पुढे स्फोटामुळे दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले तळही यात दिसत आहेत.


दरम्यान, या वर्षी २९ सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हा दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याची तयारीही सुरु झाली आहे. हा मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी नवी दिल्लीतील इंडिया गेट जवळ होणार आहे. याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान मोदी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी एक गाणेही तयार करण्यात आले आहे. या महोत्सवात देशाची तिनही सैन्यदले सहभाग घेणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New video clips released of surgical strike happened at pok two years ago