Hafiz Saeed: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्लीतील एका न्यायालयाला माहिती दिली आहे की, हाफिज सईद आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा अजूनही भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. एनआयएने २८ एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायाधीश चंदरजीत सिंग यांच्यासमोर मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याच्या कोठडीवरील सुनावणीदरम्यान ही माहिती दिली.

तहव्वुर राणा याच्या कोठडीची मागणी करताना एनआयएने म्हटले आहे की, तहव्वुर राणा लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा प्रमुख हाफिज सईद यांच्या भारताविरोधात चालू असलेल्या आणि भविष्यातील दहशतवादी कटांवर प्रकाश टाकू शकतो.

पीटीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने म्हटले आहे की, “हाफिज सईद हा या प्रकरणातील आरोपी आहे आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा अजूनही भारतात दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. लष्कर-ए-तैयबाच्या कार्यवाहीची माहिती उघड करण्यासाठी राणाची आणखी काही काळ कोठडी आवश्यक आहे.”

हाफिज सईद पाकिस्तानच्या कथित कोठडीत आहे, तो अनेक दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याच्या प्रकरणांमध्ये ४६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. सात दहशतवादी घटनांमध्ये पैसे पुरवल्या प्रकरणी दोषी आढळल्यामुळे, सईद १२ फेब्रुवारी २०२० पासून शिक्षा भोगत आहे.

पाकिस्तान सईद शिक्षा भोगत असल्याचा दावा करत असताना, अनेक अहवाल असे सूचित करतात की लष्कर-ए-तोयबाच्या संस्थापकाला क्वचितच पारंपारिक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. यामुळे त्याला पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरणे शक्य आहे.

तहव्वुर राणा यांच्याबाबत, एनआयएने म्हटले आहे की, ते राणाच्या आरोग्याचा विचार करून मर्यादीत चौकशीच करत आहेत, परंतु दिवसातून २० तास चौकशी केली जात असल्याचा त्याचा दावा आहे.

दरम्यान, २८ एप्रिल रोजी न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या एनआयए कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ केली आहे.

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर हुसेन राणाला गेल्या महिन्यात भारतात आणण्यात आले आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक आहे जो अमेरिकेत राहत होता. अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी त्याला विविध दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याबाबत दोषी ठरवले होते.

Live Updates