नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर ‘एनआयए’ने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हल्ल्यानंतर ‘एनआयए’ची पथके बुधवारपासून घटनास्थळी असून काही धागेदोरे सापडतात का याचा शोध घेत आहेत. ‘एनआयए’च्या पथकांचे नेतृत्व महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून केले जात आहे. दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवण्यासाठी तपास करणारी ‘एनआयए’ पथके प्रवेश आणि निर्गमन ठिकाणांची बारकाईने तपासणी करत आहेत. न्यायवैद्याक आणि अन्य तज्ज्ञांच्या मदतीने हा तपास सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासात रशिया, चीनच्या सहभागाचा प्रस्ताव

मॉस्को : पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ देशांकडून तपासात रशिया आणि चीनने सहभागी व्हावे अशी पाकिस्तानची इच्छा असल्याचे वृत्त रशियातील माध्यमांनी दिले आहे. रशियाच्या सरकारी ‘आरआयए नोव्हेस्ती’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा अहमद म्हणाले की, ‘‘रशिया किंवा चीन किंवा अगदी पाश्चात्त्य देशही या संकटात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच ते या हल्ल्याच्या तपासासाठी पथकही नेमू शकतात. भारताकडून खोटे सांगितले जात आहे का याचा तपास आंतरराष्ट्रीय पथकांना करू द्या.’’