देशातील सर्वात मोठ्या हेरॉईन ड्रग्ज तस्करीपैकी एक असलेल्या गुजरातच्या मुंद्रा बंदरावरील तस्करीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. जवळपास २१,००० कोटी रुपयांचे २९८८ किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा तपास करणार आहे.
बुधवारी जारी केलेल्या गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने माचावरम सुधाकरन, दुर्गा पीव्ही गोविंदाराजू, राजकुमार पी आणि इतरांविरोधात आयपीसी, एनडीपीएस कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुजरातमध्ये सर्वात मोठी ड्रग्ज तस्करी, ३ महिन्यांपूर्वीही अशीच मोठी खेप, दिल्लीत माल पाठवल्याचा संशय
नेमकं प्रकरण काय?
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये ठिकाठिकाणी छापेमारी करत कारवाई सुरू आहे.
टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तीन स्तर करुन हेरॉईन लपवले
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय डग्ज तस्करी करणाऱ्या या आरोपींनी कागदोपत्री टाल्क स्टोनची वाहतूक करत असल्याचा बनाव केला. मात्र, वास्तवात कंटेनरमधील टाल्क स्टोनचे ३ आवरणं करुन त्याखाली हेरॉईन ड्रग्ज लपवण्यात आलं होतं.