Nicky Haley २२ एप्रिलला पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांनी भारतातल्या काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी आलेल्या २६ पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र पाकिस्तानने त्यानंतरही आगळीक करणं सोडलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानला भारताने जशास तसं उत्तर दिलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या नेत्या निकी हॅले यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानने हल्ला पीडित असल्याचं कार्ड खेळू नये असं आता निकी हॅले यांनी म्हटलं आहे.

रात्रभरात काय काय घडलं?

भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानची आगळीक वाढली आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारताती काही लक्ष्य करून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र, भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या कुरापतींसाठी सज्ज असल्यामुळे भारतानं ड्रोनचे हे हल्ले निष्प्रभ ठरवले. त्यानंतर भारताकडूनही पाकिस्तानमधील काही ठिकाणांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले. त्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूला काही भागांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आता अमेरिकेतल्या निकी हॅले यांनी पाकिस्तानने पीडित आणि बिचारे असल्याचं कार्ड खेळू नये असं म्हटलंय.

काय आहे निकी हॅले यांची पोस्ट?

दहशतवाद्यांनी हल्ला करुन निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्यानंतर प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानने आता हल्ला पीडित आहोत वगैरे कार्ड खेळू नये, उगाच कांगाव करु नये. दहशतवादी कारवायांना तुम्ही पाठिंबा दिला म्हणून तुम्हाला कुणी असंच माफ करणार नाही. भारताने जे केलं ते योग्यच आहे. असं म्हणत निकी हॅले यांनी पाकिस्तानला झापलं आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स काय म्हणाले?

भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत, फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स म्हणाले की, “आपण लोकांना केवळ तणाव कमी करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु आपण अशा युद्धात अडकणार नाही जे मुळात आपले काम नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेचा काहीही संबंध नाही.”

पाकिस्तानचे ५० ड्रोन भारताकडून नेस्तनाबूत

भारताने गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानचे ५० ड्रोन्स निकामी केले आहेत. उधमपूर, संभा, जम्मू, अखनूर आणि पठाणकोट या ठिकाणी हे ड्रोन हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि हे ड्रोन हाणून पाडले. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे. युद्धासारखीच परिस्थिती दोन्ही देशांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान निकी हॅले यांनी पोस्ट करत पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करु नये असं म्हणत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.