जगातून पोलिओचे २०१८ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याची मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. नायजेरिया आणि पाकिस्तानातील हिंसाचारामुळे नियोजित मुदतीत उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचा इशारा गेट्स यांनी दिला आहे.
बिल आणि त्यांच्या पत्नी मेलिंदा गेट्स प्रतिष्ठानने २०१३ मध्ये वैद्यकीय संशोधन आणि लसीकरण मोहिमेसाठी धर्मादाय ट्रस्ट स्थापन केला आणि पुढील सहा वर्षांत पोलिओचे समूळ उच्चाटन करणे याला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. तथापि, या मोहिमेत अद्यापही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे.
भारतात एकेकाळी पोलिओची समस्या मोठय़ा प्रमाणावर होती, मात्र गेल्या तीन वर्षांपासून भारत पोलिओमुक्त झाला आहे. तथापि, अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान येथून पोलिओ हद्दपार झालेला नाही.
नायजेरिया आणि पाकिस्तानातील स्थिती अधिक धोकादायक आहे. तेथील परिस्थितीवर मात करण्यात आली नाही तर ही मोहीम आणखी एक ते दोन वर्षे पुढे जाईल. गेट्स यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वीच कराची शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेतील तीन कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
पाकिस्तानातील पेशावर शहरात पोलिओचा संसर्ग सर्वात मोठय़ा प्रमाणावर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले होते. लसीकरण मोहिमेला पाकिस्तानी तालिबान्यांकडून होणारा विरोध आणि नायजेरियाच्या उत्तरेकडील भागांत इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांची झालेली घुसखोरी यामुळेही स्थिती बिकट झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तान, नायजेरियात पोलिओमुक्तीच्या उद्दिष्टास विलंब
जगातून पोलिओचे २०१८ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याची मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
First published on: 23-01-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigeria pakistan could delay polio free goal