काँग्रेसचे कायकर्ते संदीप सावंत यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेचच त्यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. पण स्थानिक न्यायालयाने तो फेटाळला. त्यामुळे त्यांना जामीनासाठी खेडमधील सहजिल्हा न्यायालयात जावे लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी नीलेश राणे चिपळूण पोलीस ठाण्यात शरण आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यावर अटकेची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
उच्च न्यायालयाने नीलेश राणे यांना २३ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर या प्रकरणात अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्जही फेटाळला होता.
सावंत यांचे गेल्या २४ एप्रिल रोजी चिपळूण येथील त्यांच्या घरातून अपहरण करून मुंबईला नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा नीलेश, त्यांचे अंगरक्षक मनिष सिंग, जयकुमार पिलाई, स्वीय सहाय्यक तुषार पांचाळ आणि कुलदीप उर्फ मामा खानविलकर यांच्याविरूध्द नोंदवण्यात आला आहे. नीलेश राणे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात संदीप सावंत गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रत्नागिरी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून नीलेश राणे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप असून, या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करून तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2016 रोजी प्रकाशित
संदीप सावंत मारहाण प्रकरणी नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी
उच्च न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले होते
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 20-05-2016 at 10:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane in chiplun police station